Thursday, December 25, 2025

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मात्र मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होऊन एक महिना उलटला तरी या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम आहे. राज्य सरकारला लोकार्पणासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे प्रवाशांना या टप्याची प्रतीक्षा कायम आहे. अनेकदा नियोजन करूनही या मेट्रोचे लोकार्पण अद्याप होऊ शकलेले नाही. गुरुवारी नियोजित असलेला कार्यक्रमही घोषणा होण्याआधीच रद्द करण्यात आला आहे.

अंधेरी पश्चिम ते मंडाळे या मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात डायमंड गार्डन ते मंडाळे या ५.६ किमीच्या मार्गिकेचा समावेश आहे. भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्यासोबतच मेट्रो २ बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे ८ ऑक्टोबर रोजी लोकार्पण केले जाणार होते. मात्र तोपर्यंत सीएमआरएस प्रमाणपत्र न मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले व ऑक्टोबरच्या अखेरीस लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र लोकप्रतिनिधींची वेळ न मिळाल्याने पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकार्पण करण्याची तयारीही करण्यात आली. मात्र हे लोकार्पणही पुढे ढकलण्यात आले.

Comments
Add Comment