Friday, December 5, 2025

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

औद्योगिक वसाहतींतील अंतर्गत रस्त्यांची चाळण

महाड  : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांनी व धुळीच्या साम्राज्याने कहर माजला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरून जाताना कामगार वर्गासहित वाहन चालकांना पडला आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र गप्प बसून बघ्याची भूमिका घेत असल्याने कारवाई कोणी व कोणावर करायची असा प्रश्न कामगार वर्गासहित वाहन चालकांना पडला आहे. महाड औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रीट करण्याचे काम पुर्ण होत असताना अंतर्गत रस्त्यांची मात्र मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य डले असताना ते भरण्याचे नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ घेत नसल्याने संपूर्ण अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली आहे.

ठिकठिकाणी रस्त्यांची झालेली दुरवस्था, औद्योगिक वसाहतीतील सर्वच अंतर्गत रस्त्यावर पाहण्यास मिळत आहे. मात्र, ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारे ट्रक नागोठण्यापासून महाड पर्यंत येत असताना नागोठण्याजवळ तसेच सुकळी खिंडीमध्ये व महाड येथील केंबुर्ली जवळ महामार्ग सुरक्षा वाहतूक पथक असताना या वाहतूक शाखेला ओव्हरलोड वाहतूक करणारे कोळशाचे ट्रक दिसत नाहीत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अन्य वाहन चालकांवर कारवाई करणारे महामार्ग सुरक्षा पथक या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या कोळसा ट्रक चालकांवर कधी कारवाई करणार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना देखील महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड कोळसा वाहतुकीचे ट्रक वाहतूक करीत असताना दिसत नाहीत का? असा सवाल वाहन चालक व प्रवासी वर्ग विचारीत आहे. एकंदरीत अवजड वाहनांच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक केल्याने औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच, या रस्त्यांवर पडलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे प्रदूषणात वाढ होत असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ गप्प का असा सवाल या परिसरातील जनता प्रदूषण नियंत्रण महामंडळाला विचारत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेच आहे. मात्र, अंतर्गत रस्त्यांवर धुळीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ झाली असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र गप्प का असा सवाल कामगार वर्गासहित वाहन चालक विचारीत आहेत.

Comments
Add Comment