Thursday, December 4, 2025

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली आरोपी कोमल काळे ही तब्बल ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली रीलस्टार आहे. सोशल मीडियावर रील्स करून नेटकऱ्यांचे मन आकर्षित करणारी रीलस्टार कोमल काळे प्रत्यक्षात बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने आणि पर्स चोरणारी चोरटी निघाली आहे. या कारनाम्यांमध्ये तिचा प्रियकर सुद्धा तिला साथ देत होता.

पाथर्डी–कल्याण एस.टी.ने प्रवासात अलका पालवे यांच्या पर्सवर कोमलने हात साफ केल्याची तक्रार १९ नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने कोमल काळे हिला पाथर्डी बसस्टँड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने आपला प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे चोरीचा माल दिल्याचे कबुल केल्यावर पोलिसांनी तातडीने शेवगाव येथून सुजितला अटक केली.

कोमल काळे आणि तिचा प्रियकर चोरी केलेल्या वस्तू विकून महागड्या वस्तू खरेदी करत होती. महागडे कपडे, मोबाईल, रिल बनवण्यासाठी कॅमेरे अशा अनेक वस्तूंची तिने चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. ज्या महिलेने चोरीची तक्रार दाखल केली होती त्या महिलेच्या पर्समधून चोरलेले पैसे आणि दागिन्यांमधून कोमलने आयफोन 17 प्रो मॅक्स व ओप्पो कंपनीचा एक १५ हजाराचा मोबाईल खरेदी केल्याचे उघड झाले. तर पोलिसांनी त्यांच्याकडून साडे सहा तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३५ हजार २३० किंमतीचा माल जप्त केला.

इंस्टाग्राम आयडी komal_kale_1_ वर ५० हजारांहून अधिक फॉलोवर्स, रिल्स शूट करणारी इंस्टा मॉडेल अशी स्वतःची ओळख सांगून कोमल बसप्रवासात महिलांचा विश्वास संपादन करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्यावर पूर्वी बीड व अहिल्यानगरमध्ये ३ गुन्हे दाखल आहेत. तर सुजितवर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा ८ गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कोमल आणि तिचा प्रियकरावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२)अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या दोघांनी अजून किती ठिकाणी चोरी केल्या आहेत याचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment