डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. माहिती मिळताच अनेक जण घटनास्थळी पक्ष्यांना पाहण्यासाठी गोळा होऊ लागले. परिसरातील रस्ता आणि झाडाझुडपांमध्ये मेलेल्या पक्ष्यांचा खच आहे. इतक्या मोठ्या संख्येने तेही एकाच ठिकाणी मृत पक्षी आढळल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस तसेच वनविभागाला ही माहिती मिळताच अधिकारी, कर्मचारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने सर्व मृत पक्ष्यांना ताब्यात घेत पंचनामा केला. सर्व पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या पक्षांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही नागरिकांना रस्त्याच्या दुतर्फा काही मृत पक्षी पडलेले आढळले. अशाचप्रकारे अन्य ठिकाणीही पक्षी मृतावस्थेत पडल्याच्या बातम्या स्थानिकांमध्ये पसरल्या. एकाला माहिती मिळताच अन्य लोकही लगेच त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी सांगू लागले. हे मृत्यू नैसर्गिक आहेत का या पक्ष्यांवर कुठल्या रोगाचा फैलाव झाला आहे की विषबाधा याची चाचपणी केली जाईल. कोणी हेतूपुरस्सर त्यांना विषारी पदार्थ दिला का ? ही शक्यता तपासण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाले, ठाणे वन्यजीव अधिकारी सोनल वळवी आणि इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वन विभागाने घटनास्थळ आणि आसपासच्या परिसराची तपासणी केली असून माती, अन्नाचे नमुने तसेच पक्ष्यांचे ऊतक नमुने गोळा करण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.