डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय व नागरी सोयीसुविधा मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलकुंभ, पूल, सभागृह विकास, रस्ते कॉंक्रिटीकरण अशा कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनि त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांनी सर्वसमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५ विकासकामांसाठी तब्बल १६ कोटींचा निधी मिळवण्यात यश आले आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खा.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला.
जुनी डोंबिवली परिसरातील प्रभाग क्रमांक ६४ साठी उंच जलकुंभ आणि पंप हाऊस बांधण्यासाठी ७ कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १.७६ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील देविचा पाडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह विकसित करण्यासाठी १.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गोग्रासवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी ५० लाख, गरिबाचा वाडा ते ४५ मीटर रिंगरोड जोडणारा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ५ कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे महत्वाच्या रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या आणि पूल बांधणीचा कामाला गती मिळणार आहे.






