डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे सामने ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून या स्पर्धेचं आयोजन डोंबिवलीकर संस्थेने केले आहे. हा उपक्रम आमदार रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे.
यंदाच्या चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या ८ दिग्गज महानुभवांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने संघ बनवण्यात आले आहेत. पहिला संघ निळू फुले संघ असून त्याचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव आहे. या टीममध्ये नूपुर दुधवाडकर, वरद चव्हाण, ऋषिकेश पाटील, तेजस बर्वे, सुप्रीत कदम, शिव ठाकरे, ऋतुजा लिमये, ऋतुजा कुलकर्णी आहेत, तर दुसरा भालजी पेंढारकर संघ आहे. त्याचा कॅप्टन हार्दिक जोशी असून त्याच्या टीममध्ये ऋतुराज फडके, आकाश पेंढारकर, अमोल नाईक, नचिकेत लेले, सौरभ चौगुले, रोहित शिवलकर, कीर्ती पेंढारकर, धनश्री काडगांवकर आहेत. दादासाहेब फाळके संघाचे संजय जाधव कॅप्टन असून माधव देवचक्के, सुजय डहाके, आदिश वैद्य, प्रदीप मिस्त्री, विजय आंदळकर, जगदीश चव्हाण, जयंती वाघधरे, नम्रता प्रधान त्यांच्या टीममध्ये आहेत. चौथा संघ रंजना संघ असून तितिक्षा तावडे त्याची कॅप्टन आहे. तिच्या संघात सिद्धार्थ बोडके, आशीष कुलकर्णी, प्रणव रावराणे, प्रसाद बर्वे, गौरव घाटणेकर, उमाकांत पाटील, शांतनू भाके, अमृता रावराणे यांचा समावेश आहे, तर पु. ल. देशपांडे संघाचे कॅप्टन प्रवीण तरडे असून त्यांच्या संघात अभिजीत कवठाळकर, अजिंक्य जाधव, सागर पाठक, विराट मडके, चिन्मय संत, अंशुमन विचारे, राधा सागर आहेत. सहावा संघ दादा कोंडके संघ असून प्रथमेश परब त्याचा कॅप्टन आहे, तर या संघात विजय पटवर्धन, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, रोहन मापुस्कर, विशाल देवरुखकर, कृणाल पाटील, मयुरी मोहिते, संजना पाटील आहेत. व्ही. शांताराम संघाचे कॅप्टन विजू माने असून संदीप जुवाटकर, विनय राऊळ, सुमित कोमुर्लेकर, अभिजीत चव्हाण, महेश लिमये, ओमप्रकाश शिंदे, प्राजक्ता शिसोदे, गौरी इंगवले या संघात आहेत. अखेरचा संघ भक्ती बर्वे संघ असून अनुजा साठे त्याची कॅप्टन आहे. या संघात सौरभ गोखले, वैभव चव्हाण, हर्षद अटकरी, अंगद म्हसकर, अक्षय वाघमारे, आनंद काळे, विशाल निकम, रिया राज सहभागी आहेत. दोन दिवस डोंबिवलीत फक्त क्रिकेट, उत्साह, कलाकारांची धमाल आणि मनोरंजनाचा झंझावात पाहायला मिळणार आहे.मैदानावर कलाकारांची फिल्डिंग, बॅटिंग, चौकार-षटकारांचा वर्षाव अविस्मरणीय अनुभव देणार आहे. प्रत्येक संघ महान दिग्गजांना सन्मान देत मैदानावर उतरणार असल्याने स्पर्धेला भावनिक आणि सांस्कृतिक रंगही मिळणार आहे.