मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आज शेअर वाढ झाली आहे. सेन्सेक्स ११६ व निफ्टी १८.९५ अंकांने उसळला आहे. जागतिक घसरणीचा संकेताचा परिणाम म्हणून प्रामुख्याने शेअर बाजारातील वाढ आज होत आहे कारण काल युएस बाजारात कामगार पेरोल डेटा आकडेवारी जाहीर झाली ज्यानुसार युएसमध्ये रोजगार निर्मितीत मोठी घसरण झाली. आज आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद कायम असला तरी याच रोजगार आकडेवारीनंतर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा निर्माण झाल्याने औत्सुक्याचे वातावरण गुंतवणूकदारांमध्ये कायम राहिले परिणामी बाजारात वाढ झाली आहे.
दुसरीकडे सकाळच्या सत्रात बँकेत काल सारखाच घसरणीचा पारा आजही वाढल्याने बाजारात अपेक्षित रॅली झाली नसली तरी मिड व स्मॉलकॅप मधील तेजीने बाजार 'हिरव्या' रंगात उघडण्यास मदत झाली आहे. सकाळी व्यापक निर्देशांकातील निफ्टी मिडकॅप १०० (०.३५%), मिडकॅप ५० (०.४७%), निफ्टी लार्जमिडकॅप २५० (०.२४%) निर्देशांकात वाढ झाली आहे. तर क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वाधिक वाढ आयटी (०.७१%),ऑटो (०.७१%), मेटल (०.५७%), ऑटो (०.६३%) निर्देशांकात झाली असून घसरण मिडिया (०.५८%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.१६%) निर्देशांकात झाली आहे.
आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (१.७६%), हेंगसेंग (०.२३%), जकार्ता कंपोझिट (०.१५%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण कोसपी (०.७४%), तैवान वेटेड (०.२५%), स्ट्रेट टाईम्स (०.३०%) निर्देशांकात झाली आहे.
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ उषा मार्टिन (३.३२%), पेट्रोनेट एलएनजी (२.६८%), जीएमडीसी (२.४४%), हिंदुस्थान कॉपर (२.२६%), डेटा पँटर्न (२.०८%), किर्लोस्कर ऑईल (१.९५%), पीटीसी इंडस्ट्रीज (१.७०%), हिरो मोटोकॉर्प (१.६१%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कायनेस टेक (३.२७%), हिताची एनर्जी (३.२०%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.७१%), ओला इलेक्ट्रिक (२.५५%), सफायर फूडस (२.४५%), केईसी इंटरनॅशनल (२.४६%), देवयानी इंटरनॅशनल (१.५४%), ग्लोबल हेल्थ (१.४४%), जेएम फायनांशियल (१.३५%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.३३%), सिटी युनियन बँक (१.२४%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजार सध्या दोन विरोधी शक्तींमध्ये आहे: एक नकारात्मक आणि दुसरी सकारात्मक. रुपयात ५% पेक्षा जास्त घसरण आणि चलनाला आधार देण्यासाठी हस्तक्षेप न करण्याचे आरबीआयचे धोरण हे एफआयआयच्या दृष्टिकोनातून नकारात्मक आहे. यामुळे एफआयआय पुन्हा एकदा सतत विक्रीच्या स्थितीत आले आहेत आणि निफ्टीला अलिकडच्या विक्रमी उच्चांकावरून ३४० अंकांनी खाली आणले आहे. सकारात्मक घटक म्हणजे भारताची सुधारणारी मूलभूत तत्त्वे, मजबूत आर्थिक वाढ, कमी चलनवाढ, सहाय्यक चलन आणि राजकोषीय धोरणे आणि कॉर्पोरेट उत्पन्नात सातत्याने सुधारणा होण्याचे संकेत आहेत.हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की नकारात्मक घटक नजीकच्या काळात बाजारावर भार टाकू शकतो, परंतु मध्यावधीत सकारात्मक घटक वर्चस्व गाजवतील ज्यामुळे बाजार पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करण्यास सक्षम होईल. म्हणूनच, या जवळच्या काळात चलन-प्रेरित कमकुवतपणाचा वापर दीर्घकालीन गुंतवणूकदार उच्च दर्जाचे मोठे आणि मिडकॅप स्टॉक जमा करण्यासाठी करू शकतात.'
आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' कालचा पुनर्प्राप्तीचा प्रयत्न २६००० पातळीच्या जवळ थांबला आहे असे दिसते, त्यामुळे २६१११ पातळीपर्यंत चढण्यापूर्वी किंवा २६२०० पातळीच्या पुढे ब्रेक येण्यापूर्वी पुन्हा एकत्रीकरण आवश्यक आहे. दरम्यान, २५९३५ पातळीच्या पुढे घसरण ही घसरगुंडी पुन्हा सुरू होण्याची पुष्टी करू शकते.'






