मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. गौरीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून ही सुनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “गौरी ही लढाऊ आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करू शकत नव्हती. हे प्रकरण हत्येचे आहे. आत्महत्येनंतर अनंत गर्जे हाच गौरीला रुग्णालयात घेऊन गेला होता, मात्र तिथून तो फरार झाला. त्याने गौरीच्या आई-वडिलांना आत्महत्येची माहिती दिली”, असा दावा गौरीच्या आईने केला आहे.
डॉ. गौरी यांच्या आई-वडिलांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी दिले. भेटीनंतर गौरीच्या आईंने माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आमचे जे काही प्रश्न सुटत नव्हते, त्याची सविस्तर चर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत केली. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि शेवटपर्यंत सोबत राहू असे आश्वासन दिले आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, की ते जे बोलले ते करतील.”