Saturday, December 27, 2025

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास करण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगपासून ते अगदी साधे कोर्ट मॅरेजपर्यंत अनेक प्रकारे नियोजन केले जाते. नातेवाईक आणि पाहुण्यांचा मान-सन्मान राखला जाईल, त्यांना कसलीही कमतरता पडणार नाही, याची विशेष काळजी यजमान मंडळी घेतात. मात्र, अनेक भारतीय लग्नांमध्ये आमंत्रित नसतानाही प्रमाणापेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहतात. या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्था कोलमडून पडते. याचा थेट परिणाम जेवणाच्या व्यवस्थेवर होतो. अनेकदा जेवण कमी पडते आणि पाहुण्यांचा हिरमोड होतो. काही पाहुणे परिस्थिती समजून घेतात, पण काही पाहुण्यांचा 'तोरा' मोठा असतो. ते या छोट्या गोष्टीचा इश्यू करतात आणि मग वादाला सुरुवात होते. बिहारमध्ये नुकतेच एका लग्नात असेच काहीसे घडले आहे, पण या घटनेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. चक्क रसगुल्ल्यांवरून या लग्नात पाहुण्यांमध्ये भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. लग्नाच्या उत्साहात सहभागी झालेल्या पाहुण्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि लग्नाचा मंडप क्षणात हाणामारीचा आखाडा बनला. या घटनेमुळे एका गोड समारंभाचा अत्यंत कटू आणि विकृत शेवट झाला.

रसगुल्ला कमी पडला आणि लग्नाचा आखाडा झाला!

बिहारच्या बोधगया येथील एका हॉटेलात २९ नोव्हेंबर रोजी एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विधी उत्साहात सुरू होते, पण जेवणाच्या वेळी अचानक एक अशी गोष्ट कमी पडली, ज्यामुळे संपूर्ण लग्नच रद्द करण्याची वेळ आली! ही गोष्ट दुसरी तिसरी नसून, केवळ 'रसगुल्ला' (गुलाबजाम) होती. रसगुल्ले कमी पडल्यामुळे नवरदेव आणि नवरीकडील मंडळींमध्ये शाब्दिक चकमक उडायला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला की, काही मिनिटांतच लग्नाचा मंडप हाणामारीचा आखाडा बनला. एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, खुर्च्या उचलून फेकल्या गेल्या आणि ताट-ग्लासेसचा वापरही एकमेकांना मारण्यासाठी करण्यात आला. या 'रसगुल्ला रणसंग्रामात' अनेकजण जखमी झाले, तर निर्दोष पाहुण्यांनाही या भांडकुदळ पाहुण्यांचा चोप बसला.

वरमाळा गळ्यात पडणार तोच गोंधळ!

लग्न सोहळ्यातील इतर सर्व विधी व्यवस्थित पार पडले होते. नवरा-नवरी केवळ मंडपात एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालणार होते आणि सोहळा पूर्ण होणार होता. मात्र, त्याच वेळी सुरू झालेल्या या जोरदार हंगामामुळे हाणामारी विकोपाला गेली आणि दोन्ही बाजूच्या वरिष्ठांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला.

भांडण 'गुलाबजाम'चं, तक्रार 'हुंड्याची'!

हा वाद फक्त मिठाईपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याला एक विचित्र राजकीय वळण मिळाले. नवरदेवाचे वडील, महेंद्र प्रताप, यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "वाद केवळ रसगुल्ल्यांवरून सुरू झाला होता. पण नवरीकडील मंडळींनी याचा गैरफायदा घेत आमच्याविरोधात हुंडा मागण्याचा खोटा आरोप करून पोलिसांत तक्रार दाखल केली."

मुन्नी देवी (नवरदेवाची आई) यांनीही सांगितले की, त्यांनी दागिने आणि नवरीला घेऊन हॉटेलमधून काढता पाय घेतला. नवरदेवाकडील मंडळी आजही लग्नासाठी तयार आहेत, पण नवरीकडील मंडळींनी नकार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, हे फुटेज पाहून पोलीस आता अधिक तपास करत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही लोक पोट धरून हसत आहेत, तर काही जणांना 'एका रसगुल्ल्याची किंमत किती मोठी असू शकते,' असा विचार करून डोक्याला हात लावावा लागत आहे.

Comments
Add Comment