छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येत आहे. गुरुवारी एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती. मात्र, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दिले जाणारे हॉलतिकीट मिळालेच नाही.
नेमके काय घडले?
विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हॉलतिकीटसाठी महाविद्यालयात पोहोचले. परंतु, महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या धरल्यानंतर ही स्थिती आणखी गंभीर बनली.
हॉलतिकीट नसल्याने शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. यानंतर पोलिसांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. विद्यार्थीही विद्यापीठात पोहोचले. तेव्हा उघड झाले की संबंधित महाविद्यालयाला विद्यापीठाचे संलग्नीकरणच नसल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झाली.






