Thursday, December 4, 2025

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच एकदिवसीय सामन्यांतील क्रमवारीची घोषणा केली. या नवीन क्रमवारीनुसार, भारताचा फलंदाज विराट कोहली याला फायदा झाला असून, त्याने पुन्हा अव्वल स्थानाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १२० चेंडूंत १३५ धावांची दमदार शतकी खेळी केली होती. या विस्फोटक खेळीच्या बळावर कोहलीने आयसीसी वनडे वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, कोहलीने आता चौथे स्थान पटकावले आहे. त्याचे रेटिंग गुण वाढून ७५१ झाले आहेत. तो आता अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्मा याच्यापासून केवळ ३२ गुणांनी मागे आहे. यामुळे विराट कोहली पुन्हा एकदा जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. रोहित आणि विराटच्या मध्ये न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल (दुसरा) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान (तिसरा) हे दोनच खेळाडू आहेत. मागील दशकाच्या अखेरीस कोहलीने सलग तीन वर्षांहून अधिक काळ नंबर १ चा ताज आपल्याकडे ठेवला होता. एप्रिल २०२१ मध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकले होते. टॉप-१० वनडे फलंदाजांमध्ये रोहित आणि विराट यांच्या व्यतिरिक्त भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल देखील आहे. या क्रमवारीत गिलला एका स्थानाचे नुकसान झाले आहे आणि तो आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. सहाव्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंत इतर कोणत्याही फलंदाजाच्या क्रमवारीत बदल झालेला नाही.

Comments
Add Comment