भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
सांख्य तत्त्वज्ञानाचे आद्यप्रवर्तक कपिलमहामुनी होत. त्यांनी सांख्यदर्शनाचे सूत्रमय दर्शन आपणास करून दिले आहे. या दर्शनात प्रकृतिपुरुष विवेकाने पुरुषाचे असंग ज्ञान करून घेण्यास सांगितले आहे. बहुरंगी, बहुढंगी, सदा गतिमान, सतत नाश पावून पुन्हा पुन्हा निर्माण होणारी सगुण, सविकारी, सत्त्व-रज-तम या तीन गुणांनी बनलेली जडसृष्टी म्हणजे प्रकृती आणि निचळ, निर्लेप, निर्विकारी, चेतन आत्मतत्त्व म्हणजे पुरुष होय. पुरुषाने प्रकृतीपासून आपल्या अलगतेचा बोध करून घेणे म्हणजेच मोक्ष होय. महत्, मन, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूते, दश इंद्रिये व पंच विषय या चोवीस तत्त्वांनी प्रकृती बनली आहे. पंचवीसावे तत्त्व म्हणजे पुरुष होय, विश्वाचा उद्भव हा विकसनशील प्रक्रियेने झाला आहे, असे सांख्य तत्त्वज्ञान सांगते. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही भारतीय अध्यात्मातील षड्दर्शने होत. यातील कपिलमहामुनींचे सांख्यदर्शनातील तत्त्वांचा प्रभाव भारतीय तत्त्वज्ञानावर पडलेला दिसून येतो, मात्र या दर्शनात प्रकृती एक व पुरुष म्हणजे आत्मा अनेक मानले आहेत, त्यावर वेदान्ताने आक्षेप घेतला आहे. महर्षी व्यासांच्या ब्रह्मसूत्रात सांख्यशास्त्रातील या पुरुषतत्त्वाच्या अनेकत्वाचे खंडन केले आहे. असे जरी असले तरी आपल्या भागवतपुराणात महर्षी व्यासांनीच भगवंतांचा अवतार म्हणून कपिल महामुनींचा गौरव केला आहे. सांख्यदर्शनातील अनेक संकल्पना भारतीय अध्यात्माने स्वीकारल्या आहेत. कपिल-देवहुती संवाद सविस्तर रंगविला आहे. या संवादास कपिलगीता असे म्हणतात.
महर्षी कपिलांनी आपल्या मातेस प्रकृतीचे दोन भेद सांगितले. एक अविद्या व दुसरी माया. अविद्या ही ज्ञानाला आच्छादन करणारी जीवाची उपाधी होय आणि माया ही ब्रह्माण्डाचा पसारा मांडणारी ईश्वराची शक्ती होय. भगवंतांच्या एकनिष्ठ भक्तीने जीवाचे अज्ञान व जगतभास दूर होतो. पण ही भक्ती निर्माण होण्यासाठी प्रथम कडकडीत वैराग्य उत्पन्न झाले पाहिजे, असे सांगून महर्षी कपिलांनी योगाभ्यास कसा करावा, हेही देवहुतीला सविस्तर सांगितले. ध्यानाच्या पायऱ्या समजावून सांगितल्या. काळाच्या स्वरूपाचे वर्णन केले. हे सर्व ऐकून देवहुतीने कपिलमहामुनींचे मनोभावे स्तवन केले. आपल्याप्रमाणे इतर मुमुक्षूंनाही कपिलांनी आत्ममार्ग दाखवून द्यावा, असे म्हटले. ब्रह्मज्ञानी झालेल्या आपल्या मातेची अनुज्ञा घेऊन कपिल महर्षी बिंदुसरोवराच्या परिसरातून बाहेर पडले. देवहुती मात्र त्याच बिंदुसरोवराजवळील आपल्या आश्रमात राहिली. तिने पुत्राने उपदेशिलेल्या योगमार्गाचा अवलंब केला. परमेश्वराचे परिपूर्ण ध्यान करून समाधीस्थ झाली. महर्षी कपिलांनी नंतर संपूर्ण भारतवर्षाची परिक्रमा करून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. मुमुक्षूंना ज्ञानदान केले. अखेरीस ईशान्य दिशेस जाऊन त्यांनी एकाग्र चित्ताने समाधी घेतली. भगवद्गीतेत भगवंतांनी सिद्धानां कपिलो मुनिः -सर्व सिद्धांमधला कपिलमुनी मी आहे (गी.१०.२६) असे म्हटले आहे. यावरून कपिलमुनींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
कपिलमहामुनींच्या सांख्य तत्त्वज्ञानाचा साकल्याने विचार करता, पंचमहाभूते (Five Prime Elements) - पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश म्हणजे आधुनिक विज्ञानानुसार अनुक्रमे C, H2O, O, N & SPACE हे आहेत. तसेच महत्तत्त्व म्हणजे H आणि पुरुष म्हणजे चैतन्य होय आणि त्याही पलीकडील परम तत्त्व म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य होय. जगातील सर्व पदार्थ वरील तत्त्वांपासून बनलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वैशिष्ट्य अनुक्रमे गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे ही त्या पदार्थांना लागू होतात. ही सर्व तत्त्वे घन स्थितीपासून विरल, तरल व अतितरलतेकडे जातात. त्रिगुण म्हणजेच प्रकृतीचे तीन मूलभूत गुण सत्त्व, रज आणि तम होय.
सत्त्वगुण चांगुलपणा, ज्ञान आणि शांततेशी संबंधित आहे, तर रजगुण क्रियाशीलतेशी आणि अहंकाराशी संबंधित आहे. तमोगुण आळस, क्रोध आणि नकारात्मकतेशी संबंधित आहे. तमोरजोगुणाकडून सत्त्वगुणाकडे जाणे म्हणजे जडत्वापासून शुद्ध चैतन्याकडे जाणे होय. सांख्य तत्त्वज्ञान हेच सांगते की, आपला आचारविचारांसह जीवनप्रवास हा जडत्वाकडून शुद्ध चैतन्याकडे म्हणजे फक्त पार्थिव शरीराचा विचार न करता अंती परमार्थापर्यंत असावा, म्हणजेच मी आणि माझे यांच्याच कल्याणाचा केवळ विचार न करता आपल्यासह जगतकल्याणाचाही विचार करावा. अशा उदात्त विचारधारेचा प्रसार करणाऱ्या कपिल महामुनींना शतशः नमन...! (उत्तरार्ध)






