Thursday, December 4, 2025

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. विलेपार्लेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९८७ च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत गिशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खारदांड्याच्या शंकर मंदिरात झालेल्या सभेत हिंदुत्वावर मते मातल्याने १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि डॉ. प्रभू यांचा सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क काढून घेतला. यानंतर डॉ. प्रभू यांचे नाव हिंदुत्वाशी जोडले गेले आणि ही निवडणूक देशभर चर्चेत आली. मात्र, नंतर शिवसेनेने त्यांची अवहेलना केली, अशी खंत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशीष शेलार यांनी काल रात्री पार्ल्यात व्यक्त केली.

डॉ. प्रभू यांची कन्या लीना प्रभू यांनी सुचविल्याप्रमाणे त्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून “प्रभू महिमा” हे पुस्तक राज्यातील प्रत्येक लायब्ररीत ठेवण्यासाठी आणि हनुमान रोड मेट्रो स्टेशनला त्यांचे नाव देण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही शेलार यांनी दिले. डॉ. प्रभू यांच्या जीवनावर आधारित नाट्यरूप सादरीकरण सादर होणारे ते पहिलेच माजी महापौर असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

जुहू–विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक स्व. डॉ. पुष्पा प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित “प्रभू महिमा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित राहून मंत्री शेलार यांनी डॉ. प्रभू यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण केले.

प्रकाशनापूर्वी त्यांच्या कार्याची झलक दाखविणारे नाट्यरूप सादरीकरणही सादर केले गेले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार अँड. पराग अळवणी, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार-माजी मंत्री गजानन कीर्तिकर, माजी महापौर अँड. निर्मला सामंत प्रभावळकर, राजू रावळ, तसेच अरविंद प्रभू, लीना प्रभू उपस्थित होते.

Comments
Add Comment