Thursday, December 4, 2025

फॉर्च्युनरची डुप्लिकेट नंबर प्लेट, अवैध शस्त्र आणि पूर्वगुन्हेगाराशी संबंध; पनवेलमधील पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

फॉर्च्युनरची डुप्लिकेट नंबर प्लेट, अवैध शस्त्र आणि पूर्वगुन्हेगाराशी संबंध; पनवेलमधील पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

नवी मुंबई: पनवेल पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आल्याचे दिसले. महत्त्वाचे म्हणजे या कारमध्ये पिस्तुल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिराने घडली. संबंधित चारचाकी डुप्लिकेट नंबर प्लेट लावून चालवली जात होती. या गाडीत मिळालेल्या वाहन परवानावरून खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमने चालकाला अटक केली आहे. राजेंद्र निकम (वय ४८, रा. चुनाभट्टी, मुंबई) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक शेरखाने २ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता ऑन ड्युटी होते. यावेळी पनवेल स्टेशन परिसरात 'MH 03 AH 7863' या क्रमांकाची फॉर्च्युनर पार्किंग केली होती. या पार्किंगमुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी संबंधित वाहनमालकाशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी संपर्क केलेल्या वाहन मालकाने स्पष्ट सांगितले की, “ही गाडी माझी नाही,कोणी तरी माझ्या नंबरचा गैरवापर करत आहे.याबाबत मी आधीही तक्रारी दिल्या आहेत.”

यावरून पोलिसांना ही गाडी संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली. यावेळी गाडीचा समोरील दरवाजा किंचित उघडा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दरवाजा उघडून तपासणी केली असता कारच्या आत पिस्तुल सापडले. तसेच राजेंद्र निकम या नावाचा वाहन परवानादेखील गाडीमध्ये होता. दरम्यान 0प्रकरणी सखोल तपास करता संबंधीत व्यक्तीवर मुंबई विभागात विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही वेळाने चालकही घटनास्थळी आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

ज्याच्या नावाचा वाहन परवाना गाडीत मिळाला, तो राजेंद्र निकम घटनास्थळी आल्याने डुप्लिकेट नंबर प्लेट लावून फॉर्च्युनर कार चालवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सुपूर्द केले.डुप्लिकेट नंबर, अवैध शस्त्र आणि पूर्वगुन्हेगाराशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवली आहे.

Comments
Add Comment