राष्ट्रवादीच्या ग्रामीण ताकदीसमोर भाजपचे आव्हान

धनंजय बोडके - उत्तर महाराष्ट्र


नगर परिषदांच्या रणधुमाळीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सात आमदार असून, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात ठिकठिकाणी जोरदार लढत झाली. भाजपने भगूर व येवला येथे राष्ट्रवादीसोबत तर मनमाड आणि नांदगावमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) मदतीने युती केली. राष्ट्रवादीचे पाच आमदार असलेल्या सात नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये येवला, भगूर येथे राष्ट्रवादीला शिवसेनेने तर उर्वरित पाच ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीला थेट आव्हान दिले. यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही भाजप याच पद्धतीचा प्रयोग करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सुमारे आठ वर्षांनी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत उमेदवार, समर्थक आणि पक्षांमध्ये उत्तम उत्साह जाणवत होता. नाशिक जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्थानिक पातळीवर परस्परविरोधी युती करत निवडणूक रिंगण रंगवले. ग्रामीण भागातील सातही आमदार राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे असून दिंडोरी, निफाड, कळवण–पेठ, देवळाली, इगतपुरी, येवला आणि सिन्नर या मतदारसंघांचा समावेश होतो. शिवसेना (शिंदे गट)कडे मालेगाव बाह्य आणि नांदगाव, तर भाजपकडे बागलाण व चांदवड मतदारसंघ आहेत.


गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र त्यानंतर नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाने जोरदार तयारी केली. जास्तीत जास्त नगर परिषदांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीजेपीने अनेक स्थानिक प्रभावी नेत्यांना पक्षात दाखल करून घेतले. सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे प्रतिनिधी हेमंत वाजे यांना पक्षात घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवारही केले. यापूर्वीच राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे माजी उमेदवार उदय सांगळे आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनाही भाजपात आणण्यात आले. या तिन्ही नेत्यांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपची वाट धरली.


इगतपुरीत माजी नगराध्यक्ष संजय इंदुरकर यांना बीजेपीत घेऊन आमदार हिरामण खोसकर यांच्याविरोधात मजबूत आव्हान उभे करण्यात आले. पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधातही भाजपने जोरदार आघाडी घेतली. चांदवडमध्ये नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार होते; त्यात भाजप उमेदवार वैभव बागुल आणि राष्ट्रवादीचे सुनील बागुल यांच्यात मुख्य संघर्ष दिसून येत होता.


मनमाडमध्ये आठ उमेदवार असून, राष्ट्रवादीचे रवींद्र घोडेस्वार आणि शिवसेनेचे योगेश पाटील यांच्यात तीव्र चुरस दिसत आहे. नांदगावमध्ये भाजप उमेदवार सागर हिरे आणि राष्ट्रवादीचे राजेश बनकर यांच्यात थेट लढत आहे. येवल्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी आणि शिवसेनेचे रूपेश दराडे आमने-सामने आहेत. भगूरमध्ये शिवसेनेच्या अनिता करंजकर आणि राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांच्यात मुकाबला तीव्र आहे.


पिंपळगाव बसवंत येथे तिरंगी लढत असून राष्ट्रवादीचे शरद गायकवाड, भाजपचे डॉ. मनोज बर्डे आणि काँग्रेसचे संतोष गांगुर्डे रिंगणात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे कैलास घुले आणि राष्ट्रवादीचे सुरेश गंगापुत्र यांच्यात मुख्य लढत अपेक्षित आहे. सिन्नरमध्ये पंचरंगी सामना असून भाजपचे हेमंत वाजे, राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले आणि शिवसेनेचे प्रमोद चोथवे हे प्रमुख दावेदार आहेत. इगतपुरीत शिवसेनेच्या शालिनी खताळे आणि भाजपच्या मधुमालती मेंद्रे समोरासमोर आहेत. सटाण्यात भाजप उमेदवार योगिता मोरे आणि शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांच्यात मुख्य टक्कर आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी आपल्या सोयीचे राजकारण केले असले तरी अंतिम निर्णय जनता जनार्दनच देणार आहे आणि त्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


या लढतीकडे राज्याचेच लक्ष

सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे विरुद्ध खासदार राजाभाऊ वाजे, येवल्यात मंत्री छगन भुजबळ विरुद्ध आमदार किशोर दराडे, तर मनमाड-नांदगावमध्ये मंत्री भुजबळ विरुद्ध आमदार सुहास कांदे अशी अप्रत्यक्ष लढत रंगली आहे. आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय करंजकर यांच्यात प्रचार काळात तू तू मैं मैं झाले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक आखाड्यात जरी नसले तरी त्यांनी शेवटच्या टप्प्यातील प्रचार सभेत ऑनलाईन भावनिक साद घातली. निवडणुकीच्या तोंडावरच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी आ. किशोर दराडे तर संभाजीराजे पवार यांनी मंत्री भुजबळ यांना साथ दिली. त्यामुळे नाशिकमधील या नगर परिषदांकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Add Comment

राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादुर यांची अमर शहादत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘‘जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी हैः जो मान-अपमान नूं बराबर समझदा

राष्ट्रपतींच्या भेटीने शेगाव संत नगरीत चैतन्याचे वातावरण

वार्तापत्र : विदर्भ देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या संतनगरीला

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त...

वार्तापत्र : विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त

मिनी विधानसभेनिमित्ताने मोठी घुसळण

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रातील (कोल्हापूर-सांगली) स्थानिक राजकारणात, विशेषतः सहकारी

परभणीत महापौर इक्बाल, तर उपमहापौर देशमुख

वार्तापत्र : मराठवाडा मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लीम महापौर खुर्चीवर बसविला.

अखेर ती वेळ आलीच !

अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम जनतेची फक्त थोडीफार अपेक्षा असते,की आपल्या विभागातील सुख सुविधा आपल्या