Thursday, December 4, 2025

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असतानाच बुधवारी चार माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वसई-विरारच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने वसई - विरारमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली असून महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिकेवर सलग दोन टर्म सत्ता गाजविलेल्या बहुजन विकास आघाडीला फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आधी बविआ नेते नितीन ठाकूर, माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, माजी नगरसेवक महेश पाटील, प्रदीप पवार यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपने आपल्याकडे खेचल्यानंतर आणखीन चार माजी नगरसेवकांनी बुधवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

बविआ माजी सभापती माया चौधरी, माजी नगरसेवक राजेश ढगे, सुषमा दिवेकर, ज्योती राऊत तसेच परिवहन सभापती कल्पक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबई येथील भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी नालासोपारा आमदार राजन नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मनोज बारोट उपस्थित होते.

Comments
Add Comment