मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी. तसेच, प्रभाग प्रारुप मतदार यादीबाबत येणाऱ्या हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन यथोचित निर्णय घ्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. दरम्यान, बुधवारी शेवटच्या दिवसापर्यंत ७४५२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. मंगळावर पर्यंत ५४९४ एवढ्या होत्या, तर बुधवारी शेवटच्या दिवशी १९५८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीसंदर्भातील तक्रारी व हरकतींविषयी होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, इतर सह आयुक्त व उपायुक्त, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोघ मुकादम, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी (मुंबई उपनगरे) अर्चना कदम, उपनिवडणूक अधिकारी (मुंबई शहर) शामसुंदर सुरवसे, महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांचे सर्व सहायक आयुक्त आदी बैठकीला उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रभाग प्रारुप मतदार यादीसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाला गती द्यावी. प्रभाग प्रारुप मतदार यादीबाबत येणाऱ्या हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन यथोचित निर्णय घ्यावा. सुमारे ८ वर्षांच्या कालावधीनंतर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे, निवडणुकीच्या संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने आणि काटेकोरपणे पार पाडणे आवश्यक आहे. सध्या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामकाजास प्राधान्य द्यावे. संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी. निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावी, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
मतदाराचा मृत्यू झाल्यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अर्जदारांकडून मृत्यूबाबतचे पुरावे घ्यावेत. तसेच, महानगरपालिकेकडे असलेल्या मृत्यूच्या नोंदीशी त्याची पडताळणी करावी. १२ डिसेंबर २०२५ पूर्वी मतदान केंद्रांची यादी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक शाखेकडे सादर करावी. निष्कासित करण्यात आलेल्या इमारतीत पूर्वी मतदान केंद्र असल्यास त्याच्या जागी पर्यायी मतदान केंद्र उपलब्ध करुन द्यावे. तसेच, गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांबाबत ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले.






