रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने चार विकेट राखून जिंकला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. याआधी रांचीत झालेला एकदिवसीय सामना भारताने १७ धावांनी जिंकला होता. आता विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने ०-२ अशी आधीच गमावली आहे. यामुळे विशाखापट्टणमच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात जिंकण्यासाठी भारतावर दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत जास्त दबाव असेल. हा सामना हरल्यास भारत कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांची मालिकाही गमावेल.
रायपूरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत पाच बाद ३५८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ४९.२ षटकांत सहा बाद ३५९ धावा केल्या आणि सामना चार विकेट राखून जिंकला.
South Africa win the 2nd ODI by 4 wickets.
We go to Vizag with the series levelled at 1-1. Scorecard ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rGOhm95NnI — BCCI (@BCCI) December 3, 2025
दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मर्करामने ११०, क्विंटन डी कॉकने आठ, टेम्बा बावुमाने ४६, मॅथ्यू ब्रीट्झकेने ६८, डेवॉल्ड ब्रेव्हिसने ५४, टोनी डी झोर्झीने दुखापतीमुळे निवृत्त होईपर्यंत १७, मार्को जॅनसेनने दोन, कॉर्बिन बॉशने नाबाद २६ आणि केशव महाराजने नाबाद १० धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी दोन तर हर्षित राणा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेचा विजय झाल्यामुळे विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने केलेली शतके वाया गेली. भारताची फलंदाजी सुरू असताना यशस्वी जयस्वालने २२, रोहित शर्माने १४, विराट कोहलीने १०२, ऋतुराज गायकवाडने १०५, केएल राहुलने नाबाद ६६, वॉशिंग्टन सुंदरने एक, रविंद्र जडेजाने नाबाद २४ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने दोन तर नांद्रे बर्गर आणि लुंगी न्गिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर धावचीत झाला. पण भारतीय फलंदाजांची मेहनत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या अपयशामुळे वाया गेली.
विराट कोहलीचे सलग दुसरे शतक
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रांची आणि रायपूर या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावले. त्याने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ५३ शतके केली. विराट कोहलीने वेगवेगळ्या ३४ मैदानांवर आंतरराष्ट्रीय शतके केली. कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४६ शतके करत विक्रम केला. तो वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३ एकदिवसीय सामन्यांतील ३१ डाव खेळत १७४१ धावा केल्या आहेत. विराटने ३१ डावांपैकी १५ डावांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.






