नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४-५ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. २०२२ मध्ये युक्रेनविरुद्ध रशियाच्या विशेष लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. दोन्ही देशांमधील ही तेवीसावी द्विपक्षीय शिखर परिषद असेल, जी दोन्ही बाजूंनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
कसे असेल पुतिन यांचे वेळापत्रक?
राष्ट्राध्यक्ष पुतिन ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचतील, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ लोक कल्याण मार्ग या सरकारी निवास आणि कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता एका खाजगी भोजनाचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पुतिन यांचे औपचारिक स्वागत केले जाईल आणि त्यांना तिन्ही दलांच्या तुकडीकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. यानंतर सकाळी १० वाजता, पुतिन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचतील.
पुतिन भारत दौऱ्यावर येणार असल्यामुळे हैदराबाद हाऊस येथे २३ व्या भारत- रशिया शिखर परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन हैदराबाद हाऊसला रवाना होतील. या बैठकीत संरक्षण, ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान, अवकाश आणि धोरणात्मक सहकार्यासह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या घोषणा आणि करार अपेक्षित आहेत. दोन्ही नेते त्यांच्या चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन देखील जारी करतील.
दुपारी ४ वाजता, दोन्ही नेते भारत-रशिया व्यवसाय मंचाला देखील संबोधित करतील, ज्यामध्ये द्विपक्षीय व्यापाराला पुनरुज्जीवित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. हा टप्पा विशेषतः महत्वाचा आहे, कारण अलिकडच्या वर्षांत भारत आणि रशियामधील व्यापार संबंधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. शेवटी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती पुतिन यांच्या सन्मानार्थ एका राजकीय मेजवानीचे आयोजन करणार आहेत. यानंतर सुमारे ३० तासांच्या भारत भेटीनंतर राष्ट्रपती पुतिन रात्री उशिरा भारतातून परततील.






