ईस्त्रायल आज जगातील सर्वात ताकदवान राष्ट्र आहे आणि ते तर सर्व बाजूंनी शत्रुराष्ट्रानी वेढले आहे. त्यामुळे त्याला काहीही वाटले तरीही शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता आहे. हे सारे समजून घेतले तर शस्त्र कंपन्यांच्या मालामाल होण्यामागील अर्थकारण कळू शकते. या शस्त्रास्त्र कंपन्या आणि त्यांच्यातील स्पर्धा यामुळे जागतिक अर्थकारणावर होणारा परिणाम तर दिसतोच आहे. पण तो अपरिहार्यही आहे. कारण आज जगाला केवळ ताकदीची भाषा कळते. भारताकडे जेव्हा सामर्थ्य नव्हते तेव्हा लहान देशही भारताला डोळे दाखवत असत.आज ती हिंमत कुणाकडेही नाही. भारताने ती ताकद कमावली आहे आणि हीच भाषा जगाला कळते. त्यामुळे शस्त्र कंपन्या मालामाल झाल्या तरीही कोणताही देश आज दुसऱ्याच्या हातातील बाहुले नाही हे आजच्या जगाचे वास्तव आहे. जागतिक अर्थशास्त्राचा टीकात्मक पैलू असा आहे, की शस्त्र उत्पादन कितीही नफाखोर असले तरीही त्यात अंति मानवतेचा मुडदा पडतो. विशेषतः जेव्हा युद्धाच्या काळात हे जास्त प्रकर्षाने समोर येते. मानवी आयुष्य जेव्हा हरवते तेव्हा शस्त्र कंपन्या मालामाल होत असतात. त्याला कुणाचाही इलाज नाही. शस्त्र कंपन्यांचे व्यवसाय करण्याचे मॉडेल असे असते, की जितके लष्करी साहित्याचे उत्पादन देशात जास्त होते तितका त्याचा नफा वाढत जातो आणि तितका त्या देशाचा विजय सोपा होतो. भारताने अनेकदा हे अनुभवले आहे. विशेषतः मोदी सरकार आल्यावर भारताने संरक्षण उत्पादनाचे महत्त्व ओळखले आणि प्रत्येक वेळेला पाकिस्तानला पाणी पाजले आहे. मग ते कारगीलचे युद्ध असो, की ऑपरेशन सिंदूर असो. त्यामुळे भारताला कुणी कितीही नावे ठेवली तरीही युद्धाचे महत्त्व पटले आहे आणि त्यात लोकांचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असते, हेही पटलेले आहे.
युद्धकाळात आणि नंतरही कणव आणि दु:ख करण्याऱ्यांसाठी ढाळलेले अश्रू हे आपल्या दुर्बलतेची जाणीव करून देत असतात हे विसरून प्रत्येक राष्ट्राने प्रत्येक वेळेला वागले पाहिजे. त्यामुळे हे म्हणणे कितीही योग्य असले की लोकांचे जीव जात असले तरीही आपणही इतरांसारखे डोळ्यांवर कातडे ओढून शांत बसले पाहिजे हे चूक आहे. शेवटी आपल्या लोकांचे जीव वाचवणे आणि आपल्याला मुक्त आणि सुखी जीवन जगण्याची हमी असणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असते आणि ते युद्धातील विजयानेच मिळत असते. पण याचा अर्थ ऊठसूठ युद्ध करणे आणि आपल्याहून दुर्बल राष्ट्रांच्या लोकांचा बळी घेणे नव्हे. त्यामुळे युद्धपिपासू वृत्तीपासून आपण दूरच राहिले पाहिजे. पण वेळप्रसंगी आपण संरक्षणासही सिद्ध असले पाहिजे. शस्त्र कंपन्या मालामाल होत असतील तर त्या देशांची चूक आहे. पण रशिया आणि युक्रेन यांसारख्या देशांनी आपली युद्धखोर वृत्ती आवरली पाहिजे. म्हणून तर मोदी यांनी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात मध्यस्थी केली होती आणि आज दोन्ही देश मोदींचे म्हणणे मान्य करतात. भारताने तिसऱ्या देशांच्या प्रकरणात काही करू नये हे आपले अलिप्ततावादाचे धोरण झाले. मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात तोडगा सुचवला होता. अर्थात या युद्धात भारताला काहीही मिळणार नव्हते. पण एक देश दुसऱ्या देशाची सीमा बळकावू पाहतो आहे हे आपण सहन करू शकत नाही हेच मोदी यांनी दाखवून दिले. आज संरक्षण उद्योग हा कोणत्याही देशाचा आणि जागतिक अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कंपन्यांनी असा युक्तिवाद केला आहे, की ते देशाच्या सुरक्षेला पाठिंबा देतात. त्यांच्यामुळेच तर कामगार शक्तीला योग्य वेतन आणि काम मिळते. त्यामुळे कंपन्यांच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करता येत नाही. पण हेही विसरून चालणार नाही की या कंपन्यांच्या आर्थिक यशात कित्येक बळी गेलेल्यांचे आत्मे आहेत आणि त्यांचे उद्ध्वस्त जीवन आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे यश आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करून गेलेले प्राण यांत विसंवाद आहे. आपल्याला भूमिका घेताना ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे.