पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुल उभारला होता. या पुलामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र केंद्र सरकारने नुकतीच खडकवासला-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-माणिकबाग या ३२ किलोमीटरच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावर लवकरच मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलाचे काय होणार याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे खांब उभारण्यासाठी उड्डाणपुलाचा काही भाग फोडावा लागणार आहे. एकूण ६६ ठिकाणी पुलाला छेद देऊन हे खांब उभारण्यात येणार आहेत. परिणामी, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंची रुंदी प्रत्येकी साधारण १ मीटरने कमी होणार आहे. सध्या पुलाच्या एका बाजूची रुंदी ७.३२ मीटर आहे. मेट्रोचे खांब बसवल्यानंतर ती अंदाजे ६.३२ मीटर इतकी राहील. यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग थोडा अरुंद होणार असल्याने नागरिकांना काही दिवसांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ...
महापालिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुलाचे बांधकाम करतानाच भविष्यातील मेट्रोचा विचार करून त्यासाठीची जागा राखून ठेवण्यात आली होती. महामेट्रोने मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करताना महापालिकेसोबत समन्वय साधला होता. यावेळी या मार्गावर एकूण १०५ खांबांची अलाइनमेंट निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी ३९ खांबांचा पाया उड्डाणपुलाखाली आधीच घेऊन ठेवला आहे. उर्वरित खांब उभारताना पुलाचा भाग फोडून त्यातून खांब वर नेले जातील. हे संपूर्ण काम झाल्यानंतर दोन्ही बाजूंना दोन-दोन वाहतूक मार्गिका उपलब्ध राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यात यापूर्वी उड्डाणपुलांच्या बांधकामात झालेल्या चुका लक्षात घेता, हे काम सुरू करण्याआधी प्रशासनाने बदलांबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.






