पहिली दलित महिला उद्योजिका

दी लेडी बॉस :अर्चना सोंडे


आज स्त्रियांचं जीवन कितीतरी पटीनं सुसह्य झालं आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाही. १००वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती फार बिकट होती. दलितांच्या वाटेला अस्पृश्यतेचं जिणं आलं होतं. प्राण्यांना देखील चांगली वागणूक मिळे तिथे दलितांचा स्पर्श देखील विटाळ मानला जाई. अशा भयाण काळात दलित स्त्रियांची परिस्थिती किती बिकट असेल याचा निव्वळ विचार केलेलाच बरा. अशा या प्रचंड विषम परिस्थितीत ती पहिली महिला उद्योजिका म्हणून उदयास आली. तिने आपल्या तिन्ही मुलांना उद्योजक बनवले. आमदार बनवले. समाजाला दिशा दिली. ही प्रेरणादायी गोष्ट आहे, पैकाबाई खोब्रागडे या भारतातील पहिल्या दलित महिला उद्योजिकेची.


भिवाजी हे पैकाबाई यांचे पती. भिवाजी यांचे मूळगाव गडचिरोली जिल्ह्यात. या ठिकाणी असणाऱ्या खोब्रागडी नदीच्या किनारी राहणाऱ्या रहिवाशांना खोब्रागडे नाव पडले. पोटापाण्यासाठी चांगला कामधंदा करायला पाहिजे त्यासाठी शहरात जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे उमजल्यानंतर भिवाजी यांनी आपली पत्नी पैकाबाई व दोन मुलांसह देवाडा हे गाव सोडलं. ते चांदा शहरात आले. चांदा म्हणजे आताचे चंद्रपूर. चंद्रपूर परिसर हा जंगलाने वेढलेला, कोळसा, लोखंड, चिनीमाती, बेरियम सल्फेट खनिजे मुबलक प्रमाणात मिळणारा प्रदेश. त्यामुळे चंद्रपूर हे समृद्ध शहर म्हणून ओळखले जाई.


चांदामध्ये जिल्हा मध्यवर्ती कारागृह आहे. त्याच्यामागे त्यांनी आपलं बिऱ्हाड थाटलं. याठिकाणी त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पेरूच्या बागा, आमराई, चिंचेची झाडे, खरबूज-टरबूज-कलिंगड यांच्या वाड्या ठेक्याने घेऊन ते फळे विकू लागले. पैकाबाई प्रपंच सांभाळून आपल्या पतीला व्यवसायात हातभार देखील लावत. मनमिळाऊ स्वभावामुळे भिवाजी यांनी अल्पावधीतच फळ उद्योगात आपले स्थान निर्माण केले. भिवाजी यांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता गावातील अनेक दलित कुटुंबांना शहरात आणले. त्यांना नोकरी-उद्योगास लावले. अनेक कुटुंबांना आधार दिला. परिसरातील तत्कालिन दलित समाजाला स्वाभिमानाने, सन्मानाने जगायला शिकवले.


जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही हे भिवाजी आणि पैकाबाई या दांपत्याने जाणले होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना, पत्रुजी आणि गोविंद यांना शाळेत घातले. दोन्ही मुले लिहायला, वाचायला शिकली. आकडेमोड करू लागली. भिवाजी आणि पैकाबाई यांना तिसऱ्यावेळेस देखील पुत्रप्राप्ती झाली. या तिसऱ्या बाळाचं नाव देवाजी ठेवण्यात आले. आता कुठे चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली असे वाटत असतानाच काळाने डाव साधला. भिवाजी यांचे अकाली निधन झाले. भिवाजी यांच्या निधनाने निव्वळ खोब्रागडे कुटुंब पोरके झाले नाही, तर त्यांनी वसवलेली अनेक दलित कुटुंबे अनाथ झाली होती.


अशा कठीण प्रसंगी पैकाबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. आपल्या पतीने उभारलेल्या व्यवसायाला त्यांनी ढासळू दिले नाही. व्यवसायाची सारी सूत्रे हाती घेत हळूहळू उद्योगाची गाडी पूर्वपदावर आणली. मुलं सुद्धा मोठी झाली होती. त्यांच्यामध्ये समंजसपणा इतका होता की आपल्या आईवर व्यवसायाचा सगळा भार पडतोय हे ते पाहत होते. तिला मदत व्हावी आणि धाकट्या भावाची पण काळजी घेता यावी म्हणून पत्रुजी आणि गोविंदने शाळा अर्ध्यात सोडली. शिंपी असणाऱ्या एका दूरच्या नातेवाइकाकडे जाऊन शिंपीकाम शिकून घेतले. देवाजीने दहावी पूर्ण केली. तो कोळशाच्या खाणीत टाइमकिपर म्हणून काम करू लागला.


फळविक्रीचा व्यवसाय उत्तम चालला होता. मात्र जंगल भाग असलेल्या चंद्रपुरात लाकडाच्या व्यवसायास भविष्य आहे हे खोब्रागडे बंधूंनी जाणले. आईला या व्यवसायाचं महत्त्व पटवून दिलं. बल्लारपूर येथे मोठी जागा विकत घेऊन त्यांनी लाकडाची वखार सुरू केली. चांदा ते सिरोंचा या भागातील अनेक मजुरांना रोजगार दिला. जसं जमशेटजी टाटा यांनी जमशेदपूर वसवलं तसंच खोब्रागडे बंधूंनी बल्लारपुरात हिंगणघाटची वस्ती वसवली. लाकडाचे व्यापारी म्हणून खोब्रागडे बंधू यांचे नाव देशभरात ओळखले जाऊ लागले. एक काळ असा होता ज्यावेळेस महालामध्ये अस्पृश्यांना जाण्याची परवानगी नसे. त्याकाळी आंध्र प्रदेशात चक्क राजवाडा भाड्याने घेऊन खोब्रागडे बंधू व्यवसाय करू लागले. या राजवाड्यातील लाकडाच्या डेपोचे उद्घाटन पैकाबाई यांनी केले.


त्याकाळी विदर्भामध्ये चांदा ही कापसाची भली मोठी बाजारपेठ होती. दक्षिण-उत्तर रेल्वे जोडणारे ते एक प्रमुख जंक्शन होते. व्यापारी दृष्टिकोनातून मोक्याचे ठिकाण होते. देशभरातून येथे कापसाची मोठी उलाढाल होत असे. दूरदृष्टीच्या देवाजीने ही संधी हेरली. तो कापसाच्या उद्योगात उतरला. हा-हा म्हणता हा व्यवसाय देखील भरभराटीस आला. अशाप्रकारे कापसापासून ते अगदी सोने-चांदी, जमीन खरेदी-विक्री व्यवसायात खोब्रागडे बंधू उतरले आणि भरभराटीस आले. असं म्हणतात १९३० साली चंद्रपूरमध्ये पहिली फोर्ड मोटर घेणारे खोब्रागडे पहिले उद्योजक होते. मात्र या भरभराटीमागे पैकाबाईंची अपार मेहनत आणि आशीर्वाद होता. याचदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळ जोमाने सुरू होती. खोब्रागडे बंधू देखील बाबासाहेबांच्या अभूतपूर्व कार्याने भारावून गेले. बाबासाहेबांनी उभारलेल्या आंदोलनात देवाजीबापू सहभागी झाले. १९३७ ला बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे ते बहुमताने आमदार म्हणून निवडून आले. बाबासाहेब इंग्रजांच्या काळात मंत्री होते. दलित समाजातील १४ मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याची त्यांची योजना होती. देवाजी बापूंच्या मुलाची पण त्या १४ जणामध्ये निवड झाली. मात्र आपण मुलाला परदेशी पाठविण्यास सक्षम आहोत त्याऐवजी दुसऱ्या दलित मुलाची निवड करावी ही विनंती त्यांनी बाबासाहेबांना केली. बाबासाहेबांनी एका अटीवर ही विनंती मंजूर केली ती म्हणजे परदेशी शिकून आल्यानंतर देवाजी बापूंनी त्यांच्या मुलाला चळवळीसाठी पाठवावे. हा मुलगा पुढे दलित चळवळीचा आधारस्तंभ ठरला. त्यांचे नाव बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे.
उद्योजकता आणि समाजाची परतफेड हे पैकाबाई आणि भिवाजी यांनी दिलेली शिकवण खोब्रागडे परिवाराने अविरत अमलात आणली. भारतातील पहिल्या महिला उद्योजिकेला विनम्र अभिवादन.

Comments
Add Comment

मखमली गोड गळ्याचे मोहम्मद रफी

ज्यांना पिढ्यांच्या अभिरुचीचा अडथळा नाही, अशा गोड गळ्याच्या मोहम्मद रफी यांची आज १०१ वी जयंती. अभिजीत कुलकर्णी

पोरक्या मराठी शाळा…

डॉ. वीणा सानेकर, मायभाषा शिक्षणाने आपल्या मुलांना अतिशय ‘हुश्शार’ केले हे तर खरेच! अलीकडे बहुतेक मुले इंग्रजी

कचऱ्यापासून कागदनिर्मिती करणारी उद्योजिका

अर्चना सोंडे, द लेडी बॉस आपल्या बाबांचा व्यवसाय पाहून तिने उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यात पूर्ण गुंतून

घेतला वसा टाकू नये

पूजा काळे, मोरपीस असामी-काळजीवाहक सरकार, मत पूछो मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की छोटी सी दुकान है इस बाजार में...

मराठीच्या लढ्यातील ‘जागल्या’

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर एका कार्यक्रमात खूप दिवसांनी डॉ. प्रकाश परब यांना ऐकण्याचा योग आला. मराठी साहित्य आणि

अर्धा प्याला रिकामा, की भरलेला

माेरपीस : पूजा काळे नाण्याच्या दोन बाजू समजून घेतल्या, तर दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या वाटतात. तसंच काहीसं या