मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची योजना होती. मात्र, काही न्यायालयीन खटल्यांमुळे २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. याचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेवर होऊ शकतो. निकालादिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित केलेली आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने परीक्षा सुरळीत पार पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण एकाच दिवशी शासनाचे दोन उपक्रम असल्याने परीक्षा केंद्रांची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र राज्य आयोगाच्या गट 'ब' परीक्षेला बसणार आहेत. सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या सर्वच जिल्ह्यांमध्ये नगरपालिका असल्याने येथील निकाल प्रक्रियेत प्रशासन मोठ्या प्रमाणात व्यस्त असणार आहे. त्यामुळे प्रशासनाला परीक्षा आयोजित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून परीक्षेसाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महत्त्वाचे म्हणजे परीक्षेला २० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने आयोगाने सर्व तयारी केली असून परीक्षा केंद्रांबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणूक निकालाच्या दिवशीच परीक्षा असल्याने, जर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले, तर आयोग त्यावर निर्णय घेऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील दोन दिवसांत प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर आयोगाचे अधिकारी आणि सदस्यांची बैठक होऊन यावर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. जर परीक्षा नियोजनात कोणतीही अडचण येणार नसेल तर ही परीक्षा वेळापत्रकानुसार २१ डिसेंबरलाच होणार आहे.






