घातकी संगत

माेरपीस : पूजा काळे


गुणदोषाच्या आधारे माणसाच्या स्वभावाचे विश्लेषण करता येते. अमूक एकाबद्दल बोलताना, त्या स्वभावाशी मिळतीजुळती माणसं, त्यांचे नमुने आपणास जागोजागी दिसतात. आपण स्वतः अमूक एका स्वभावाचे बनलेलो असतो. सकल स्वभावातील गुणदोषाचे रोपण जन्मजात असल्याने या जगातून आपण कायमचे जातो तेव्हाच हा हट्टी, फिरंगी, तुसडा, अतिविचारी, लोभस, आळशी, डंख मारणारा स्वभाव लुप्त होतो. त्याची साथ सुटते. स्वभाव स्वभाव असतो. इच्छशक्तीने तो बदलता येतो. पण शक्यतो माणसं स्वभाव बदलताना दिसत नाहीत. डंख मारणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यांची लांबलचक यादी तयार होईल. वरून साधा दिसत असलेला स्वभाव आतून आसक्ती, सूडाने पेटलेला असतो. अशी माणसं विषारी विंचवासारखी असतात. विषयानुरूप आलेला मानवी सूड स्वभाव हा विषारी विंचवाची आठवण करून देणारा असल्याने विषारी विंचवाचे घातक डंख, त्याचं जीवनमान तपासणं हा आजच्या अभ्यासाचा मूळ विषय आहे.


विषारी विंचवाबद्दल आपल्याला फारशी माहिती असण्याचं कारण नाही. एकतर तो पाळीव नसतो. दगड, माती, कडेकपारीत, गवताळ प्रदेश वा अन्यत्र आढळणाऱ्या या कीटकाला पाळणं दुरापास्त आहे. दिसताक्षणी दगड, लाकडासारख्या धारदार वस्तूंनी त्याला चिरडण्यात येतं. विषारी गणल्या गेलेल्या नाग, फण्यार, लालमुंग्यांबरोबर कैक वर्षांपासून त्याची ख्याती आहे. विंचवाच्या जातीतला घातक डंख मारणारा विषारी विंचू एकीकडे तर पलीकडे... बाई हिला इश्काची इंगळी डसली ग् बाई ग् बाई ग्. लावणीवजा गाण्यातून प्रेक्षकांसमोर येत घायाळ करणारा बिनविषारी पण प्राणप्रिय असा त्याच्या वा तिच्या नजरेचा बाण डोळ्यांसमोर येतो. टोकाच्या डंखाची ही दोन उदा. पाहता प्रेम भावनेला बिलगलेल्या विंचवाची कहाणी अनेक किस्से रंगवते. तर जंगल झाडाझुडपातला विंचू किंवा इंगळी दंश करून मारते.


दंश करणं, डसणं हा त्याचा स्थायीभाव असल्याने तो प्रेमाने चावला काय किंवा क्रूरतेने चावला काय विष ते विषच हो..! आज इथे तर उद्या तिथं असं घर, कुटुंब, संसार घेऊन फिरणाऱ्या आमच्यासारख्यांच्या जीवनात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर अशी म्हण प्रसिद्ध आहे. इतर कीटकांसारखा विंचू प्रथम दर्शनी मनात वगैरे भरत नाही. संकटाची चाहूल लागताच तो नांगी टाकायला तयार असतो. गोल्डस्मिथ नावाच्या एका शास्त्रज्ञाने आपल्या हिस्टरी ऑफ द अर्थ ऍण्ड ॲनिमेटेड नेचर या ग्रंथात एक वर्णन केलंय ते असं... व्यायला आलेली एक मादी काचेच्या भांड्यात ठेवल्यावर वेळेनुसार पिल्लं बाहेर येऊ लागताचं ही मादी पिल्लांना खाण्याचा सपाटा लावते. पिल्लू जन्मताच ती त्यांना खाते. यातून फक्त एक पिल्लू वाचतं, कारण ते झटकन आईच्या पाठीवर चढून बसतं. या पिलाने पुढे आपल्या आईला खाऊन टाकले आणि आपल्या भावंडांच्या मृत्यूचा बदला घेतला. यातला अभ्यास आणि निरीक्षण सांगतं की "भूक केवळ मानवाची चिंता नसून समस्त प्राणीमात्रांना, कीटक, जीवाणूंना लागू पडते. दोन हात-दोन पाय, सरपटणारे प्राणी, पक्षी, पशू यांनाही अन्नासाठी आटापिटा करावा लागतो. वरील उदाहरण या कीटकाचा स्वभाव दाखवायला पुरेसं आहे.”


विंचवाला भेटणारा सर्वाधिक घातक शत्रू म्हणजे दुसरा विंचू होय. विंचू स्वजाती भक्षक असण्याचं कोडं उलगडण्याचा प्रयत्नात, शास्त्रज्ञांच्या मते ‘अन्नपुरवठा’ शब्दात याचं उत्तर आढळतं. भक्ष मिळवण्यासाठी भरपूर कीटक उपलब्ध असतील अशावेळी विंचू रात्री संचार करतात. आपल्या निवासस्थानी ते फार वेळ नसतात. मोठे विंचू बाहेर पडले की छोटे विंचू बाहेर पडतातच असं नाही, याउलट मोठे विंचू परतले की छोटे विंचू शिकार करायला बाहेर पडतात. तेव्हा बाहेर फारसे कीटक असतील याची खात्री नसते. डॉ. पोलीज यांच्या मते छोटे विंचू मोठ्यांना टाळण्यासाठी हा उपाय करतात. कारण मोठे विंचू या छोट्या विंचवांना गिळंकृत करण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात खाद्य पुरवठा कमी होतो तेव्हा मोठे विंचू काही धोके पत्करतात. इतर वेळी ते ज्या किड्यांच्या वाटेलाही जात नाही अशा कीटकांना पकडण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रिंकबीटल्स, मुंगळे यांना पकडू पाहतात. जगण्यासाठी विंचवांना धोके पत्करावे लागतात. या काळात मोठ्या विंचवांचा खाद्याचा निम्मा वाटा छोटा विंचवांचा असतो. जगण्यासाठी निसर्गांनं अनेक क्लृप्त्या बहाल केलेल्या असताना गाभण राहिलेली मादी गर्भाना होणारा अन्नपुरवठा रोखून स्वतःसाठी वापरू शकते. तसंच गर्भातल्या अन्नरसाचं पुन:श्च शोषण करू शकते यामुळे गर्भाची वाढ मंदावते. वसंताच्या आगमनानंतर कीटकांची संख्या वाढताच गर्भाची वाढ जोमाने होऊ लागते. अन्नाचा साठा भरपूर प्रमाणात असेल तर, विंचू अधाशासारखे खातात. अन्नाचे कर्बोदकात रूपांतर करून यकृत आणि स्नायूंमध्ये साठवून ठेवतात.


नेहमीच्या वजनापेक्षा ३४ टक्के जास्त वजन मिळण्याची क्षमता त्यांच्यात असते. शारीरिक क्रियांचा विचार करता विंचू ज्यावेळी विश्रांती घेतात तेव्हा ते मंदावलेले असतात. त्यांची वेगमर्यादा इतर कीटकांपेक्षा कमी असल्याने, फारशी ऊर्जा न वापरल्याने ते वर्षभर उपाशी राहू शकतात. डॉ. पोलीज यांनी वाळवंटातल्या विंचवांचा अभ्यास केला असता काही निष्कर्ष काढले ते असे.


विंचू ऑगस्टमध्ये पिल्लांना जन्म देतात. या काळात अन्नपुरवठा स्वल्प असल्याने बळकट पिल्ले अशक्त पिलांना मटकवतात. मादी पिलांना मारून खाते यातून जी पिल्लं वाचतात, ती जगण्याची आणि हिवाळा पार पडून जाण्याची शक्यता असते. यासाठी स्वजाती भक्षण आवश्यक. नांगीधारी विषारी विंचू तपासता विंचू चावला म्हणजे काय? याची प्रचिती येते. विंचवाचे बहुतेक गुण आपल्या स्वभावाशी जुळतात. शेवटी स्वभाव महत्त्वाचा. माणसं स्वभावाला धरून चालतात. स्वभावाला धरून बोलतात. विष पेरतात. असो आपल्याला काय.? आपण काही करून त्या विंचवाच्या नादी लागू नये. घातकी संगत जोडू नये. कासवाच्या गतीने का होईना उद्दिष्टपूर्ती करू. उत्कर्ष साधू, हेच धोरण ठेवू.

Comments
Add Comment

ऐसी मती जयाची थोर!

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर १९९० नंतर जगात जागतिकीकरण खासगीकरण-उदारीकरण हे शब्द आपल्या सतत कानांवर आदळत आले.

पहिली दलित महिला उद्योजिका

दी लेडी बॉस :अर्चना सोंडे आज स्त्रियांचं जीवन कितीतरी पटीनं सुसह्य झालं आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे स्त्री

भारताची भीती दाखवून चीनचा शस्त्र पुरवठा

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरनंतर भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनचे

मराठी शाळा : मायमराठीचा कणा!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर मराठी अभ्यासकेंद्राने नेहमीच ठाम भूमिका घेऊन मराठीविषयक प्रश्नांवर आवाज उठवला. या

मॉल मॉली आणि मी

माेरपीस : पूजा काळे मॉली आमच्या एका थोरल्या भाचीची गोड मुलगी. तिचं पाळण्यातलं नाव मलिष्का. लाडात वाढल्याने तिला

बेकरी क्वीन

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे वयाच्या १३ व्या वर्षी लग्न, स्वतःच्या मुलाला मांडीवर घेऊन दहावीची परीक्षा, बेकरी कोर्स