सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळच्या कराड परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस वाठार गावच्या हद्दीत तब्बल २० फूट खोल दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. बस दरीत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीतून जखमींना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईत तात्काळ इमर्जन्सी लँडिंग ...
५ विद्यार्थी गंभीर, १५ हून अधिक जखमी
बस दरीत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खोल दरीत कोसळलेल्या बसमधून विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी थरारक प्रयत्न केले. अपघातानंतर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या तत्पर मदतीमुळे अनेक जखमींना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घटनास्थळी कराड पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे कारण नेमके काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






