स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने दक्षिण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आठ-नऊ वर्षांनंतर स्थानिक पातळीवरील रणधुमाळी गाजली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पक्ष आणि नेत्यांना पुरता एक महिनाही मिळाला नाही. चिन्ह मिळाल्यानंतर अवघे सहा दिवस प्रचार झाला. परिणामी नेते फार काही करू शकले नाहीत. रात्र थोडी सोंगे फार अशा अवस्थेत आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील आरक्षणाने ५०% ची मर्यादा ओलांडली नसल्यामुळे इथले निकाल अडून राहणार नाहीत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कराड, मलकापूर, सातारा, फलटण, विटा, आष्टा, जत, पलूस, तासगाव, कागल, हातकणंगले यांसारख्या ठिकाणी आज होणारे मतदान या भागातील नेत्यांची कसोटी पाहणारे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्ह्यातील नेते पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंहराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, नाईक निंबाळकर, सांगलीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, विक्रम सावंत, विटा येथील आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, मुन्ना महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार मंडलिक, आमदार राजेंद्र यड्रावकर विनय कोरे यांसारख्या नेत्यांची शक्ती पणाला लागली आहे.
दक्षिण महाराष्ट्र पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित गट)ने या भागात धडाकेबाज विजय मिळवला. सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले (भाजप) यांनी १ लाख ४२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले (भाजप) यांनी पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) यांचा पराभव केला. जतमध्ये गोपीचंद पडळकर (भाजप) यांनी विक्रम सावंत (काँग्रेस)यांचा ३८,२४० मतांच्या फरकाने पराभव केला. हे निकाल स्थानिक निवडणुकीवर परिणाम करत आहेत. काही ठिकाणी विधानसभेची ती बाजी पलटली आहे. भाजपने स्थानिक पातळीवर राज्याची संघटन शक्ती लावली असून, देवेंद्र फडणवीस सरकारच्या नागरी विकास, रस्ते विकास आणि लोकोपयोगी योजनांचा प्रचार केला. मधूनमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना सुद्धा या नेत्यांच्या भाषणातून डोकावली. नागरी प्रश्नावर या निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत हे निश्चित. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या सभा व रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, ते आघाडीवर आहेत. त्यामानाने विरोधकांच्या सभा खूप कमी झाल्या. स्थानिक पातळीवरील नेत्यांनीच मैदान राखले. सत्ता पक्षातील नेते आता येतील मते मागतील आणि पुन्हा येणार नाहीत अशी टीका विरोधकांनी जोरदारपणे केली आहे. महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी शरद गट-शिवसेना उद्धव गट) अंतर्गत कलहाने आणि सरकारविरोधी भूमिकांनी घेण्यात कच खाल्ल्याने अनेक ठिकाणी ही आघाडी कमकुवत झाली. जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद) आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा दक्षिण महाराष्ट्रात होतील असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. जयंत पाटील तर आपल्या ईश्वरपूर मतदारसंघातच घुटमळले.
सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर नगरपालिकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) यांची शक्तिप्रदर्शन विधानसभा पराभवानंतर कमी झाली आहे. तरीही, काँग्रेसने प्रचार सभा घेतल्या असून, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी एकत्रित लढत आहे. आजारपणातून बाहेर येऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने विरोधकांची एकी दाखवली त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण पुन्हा एकदा उजळून निघाले आहेत मात्र या नगरपालिकेला खुल्या गटातून ओबीसी उमेदवार दिल्याने एका गटाने सर्वच पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन खुल्या जागी मराठा उमेदवार विजयी करण्याचे केलेले कॅम्पेन कितपत यशस्वी होते हे पाहायचे. उदयसिंह राजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले (भाजप) हे भाऊ सातारा आणि फलटणमध्ये प्रभावी आहेत. शिवेंद्रराजे यांच्या विधानसभा विजयामुळे भाजपला ६०-६५% जागा मिळण्याची शक्यता आहे. मंत्री जयकुमार गोरे (भाजप) आणि शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे) हे पाटण आणि माणमध्ये निधी वाटप करून मतदार आकर्षित करत आहेत. नाईक-निंबाळकर कुटुंब फलटणमध्ये प्रभुत्व गाजवत असते, समशेरसिंह नाईक-निंबाळकर हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही प्रभागांत स्वतंत्र लढत दिल्याने महायुतीत तेढ निर्माण झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील आष्टा, ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव आणि विटा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र गट आणि काँग्रेस यांच्यातील दरी रुंदावली आहे. जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील (अपक्ष) यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासोबत विलासराव जगताप (जत)आणि राजेंद्र देशमुख (आटपाडी) हे अजित पवारांच्या गटात जाऊन भाजप विरोधी पॅनल करून लढत आहेत. विश्वजित कदम (काँग्रेस) हे पलूसमध्ये प्रभावी असले तरी, विक्रम सावंत जत (काँग्रेस, विधानसभा पराभूत) गोपीचंद पडळकर यांना मात देतात का याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. विट्यात शिवसेना शिंदेचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीने भाजपचे वैभव पाटील यांच्यासमोर प्रथमच तगडे आव्हान आहे. येथे जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. त्याच पद्धतीने आटपाडीत देखील केले असून त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा विरोध स्पष्ट दिसत आहे. ईश्वरपूरमध्ये भाजपतर्फे माजी मंत्री अण्णा डांगे यांचे पुत्र चिमण डांगे हे उमेदवार असल्याने जयंत पाटील यांनी याच मतदारसंघात ठाण मांडले आहे. आष्टा आणि ईश्वरपूर या दोनवर त्यांनी खूप लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, हातकणंगले आणि इतर पालिकांमध्ये काँग्रेसचे बंटी पाटील, मुन्ना महाडिक (भाजप), हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, मंडलिक(शिवसेना शिंदे), राजेंद्र यड्रावकर (स्थानिक) आणि विनय कोरे जनसुराज्य पक्ष यांचे शक्तिप्रदर्शन होत आहे. काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिक यांसारख्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असली तरी सभा कमीच लोकांच्या झाल्या. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाडमध्ये चित्रविचित्र आघाडी बघायला मिळाली. तिन्ही जिल्ह्यांत महायुतीतील अंतर्गत स्पर्धा (भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदे सेना) विरोधी पक्षांना फायदा देऊ शकते. मात्र, सत्तेच्या विकास योजनांमुळे आणि साम, दाम, दंड, भेदाच्या राजकारणामुळे भाजपला ५०% पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. सर्वाधिक जागा याच पक्षाने लढवल्या आहेत. तिथे आपल्यकडे मागणी कमी होती याची चिंता सर्वच पक्षांना लागली आहे. आजच्या मतदानादरम्यान शांतता राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आक्षेप असले तरी, आयोगाने डबल स्टार मार्किंग केले आहे. एकंदरीत, ही निवडणूक विधानसभा निकालांचा 'रिपीट' ठरेल की नव्या आघाड्यांचा उदय होईल, हे लोकांच्या विचार करण्याच्या मुद्यावर आणि ३ डिसेंबरच्या मतमोजणीवर अवलंबून आहे.
दक्षिण महाराष्ट्रात घराणेशाही ७०% नगराध्यक्ष पदे राजकीय कुटुंबांत आणि नात्यांच्या राजकारणाने लोकशाही कमकुवत झाली असली तरी, विकासाच्या मुद्द्यावर मतदार निर्णय घेतील की प्रलोभनाला बळी पडतील हा प्रश्न आहे. भाजपची मजबुती कागदावरच कायम राहील, पण महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना लोकांनी कशी साथ दिली यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. मात्र हे निश्चित की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणातील नव्या अध्यायाची सुरुवात ठरेल.