मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच अशी होती. वेळ संपली असली तरी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा असल्यामुळे मतदान अद्याप सुरू आहे. नियमानुसार मतदानाची वेळ संपते त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीची नोंद करतात आणि त्या व्यक्तीचे मतदान होईपर्यंत मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उत्साहाने मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक चित्र दिसले. पण या निवडणुकीला निवडक ठिकाणी राड्यांचे ग्रहण लागले.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेचे विकास गोगावले आणि आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांचे समर्थक भिडले. सुशांत जाबरेंच्या समर्थकांनी विकास गोगावलेंवर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप केला. सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
बीड जिल्ह्यातील गेवराईत मोंढा भागात असलेल्या मतदान केंद्राबाहेर पवार आणि पंडित गट यांच्यात हाणामारी झाली. गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केला. राज्य राखीव दलाची एक अतिरिक्त तुकडी नियुक्त करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बीड शहरातील शाहू नगर भागातही राडा झाला. दगडफेक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन पक्षांचे मर्थक भिडले.
जळगावच्या मुक्ताईनगरांत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांवरच रक्षा खडसे संतापल्या. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे रक्षा खडसे संतापल्या होत्या.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मतदान केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या नूतन त्रंबकेश्वर विद्यालयात एका उमेदवाराचे प्रतिनिधी आणि स्थानिक पोलीस यांच्यात वाद झाला.