पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे शाहबाज शरिफ यांच्या सरकारवर विविध पद्धतीने दबाव आणत आहेत. या दबावांमुळेच शाहबाज शरिफ सरकारने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या हाती देशाची सूत्रे सोपवण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. एकदा पाकिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवले की असीम मुनीर हे कधी कसे वागतील याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे अनेक पाकिस्तानचे अभ्यासक सांगत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या जवळच्या नातलगांपैकी कोणाचीही भेट झाली नव्हती. यामुळे इमरान जिवंत आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पाकिस्तानमधील इमरान समर्थकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे बघून पाकिस्तान सरकारने इमरान आणि त्यांच्या बहिणीची भेटण्याची वेळ निश्चित केली. यानंतर इमरान यांना त्यांची बहीण भेटली. या भेटीत इमरान यांनी बहिणीला धक्कादायक माहिती दिली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख देश नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. इमरान खान यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून इमरान यांना दिवसभर तुरुंगात डांबले जाते. इमरान यांना कोणीही भेटणार नाही तसेच त्यांच्याशी कोणीही बोलणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. असीम मुनीर यांच्यापासूनच पाकिस्तानला सर्वाधिक धोका आहे; असे इमरान यांना भेटल्यानंतर त्यांच्या बहिणीने म्हणजेच डॉ. उज्मा खानुम यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले.