बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार पकडल्याची घटना समोर आली. नागरिकांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही क्षणातच हा बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
घटनेदरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल गायकवाड हे पकडलेल्या तरुणाचा बचाव करताना, तसेच उपस्थित पोलिसांशी उध्दट वर्तन करताना दिसत आहेत. कुणाल यांनी पोलिसांना धमकावत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता पुढे ढकलण्यात आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेत काही तांत्रिक कारणे आणि प्रलंबित अपीलांमुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत.






