नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. प्रतीक्षा भोसले असे मृत विवाहितेचे नाव असून, तिला पहिली मुलगी आहे. मात्र मुलगा हवा म्हणून तिच्यावर सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणात पतीसह चार जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार राजेश्वर वानखेडे यांनी सांगितले की, मुलगी प्रतीक्षाचा विवाह २०२३ मध्ये लक्ष्मण भोसले याच्याशी झाला होता. लग्नावेळी साडेचार लाख रुपये हुंडा दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर पती लक्ष्मण भोसले दारूच्या नशेत प्रतिक्षाला मारहाण करू लागला.नणंद माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख ह्या फोनवरून शिवीगाळ करून प्रतिक्षाल सतावत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
प्रतिक्षाला पहिली मुलगी झाल्यानंतर छळ आणखी वाढला. मुलगा हवा म्हणून तिच्यावर ओरड, शिवीगाळ आणि पैशांची मागणी केली जात होती. स्कूल व्हॅन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात आला. प्रतीक्षेच्या कुटुंबाने ५० हजार रुपये दिले, परंतु तरीही त्रास थांबला नाही. दरम्यान, प्रतीक्षा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली असताना झालेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तरीही सासरकडच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.
सततच्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर लहान मुलीच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी पती लक्ष्मण शंकरराव भोसले आणि नणंदा माधुरी, दीपाली व भाग्यश्री देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.






