मुंबई : रतन टाटा यांचा सेशेल्समधील आलिशान बीचफ्रंट विला आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. माहे बेटाच्या शांत, नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर असलेली ही प्रॉपर्टी, स्थानिक कायद्यानुसार परदेशी नागरिकांना खरेदी करता येत नाही. मात्र, रतन टाटा यांना या नियमातून सूट देण्यात आली होती.
विला खरेदीसाठी आता एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन पुढाकार घेत असल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी हीच मालमत्ता रतन टाटा यांना खरेदी करण्यात मदत करणारे व्यक्ती म्हणजे शिवशंकरनच होते. शिवशंकरन सेशेल्सचे नागरिक असल्याने त्यांना प्रॉपर्टी खरेदी करता येणार आहे. तज्ज्ञांनी केलेल्या मूल्यमापनानुसार या विलाची किंमत केवळ ₹८५ लाख इतकी आहे. मात्र शिवशंकरन ही प्रॉपर्टी सुमारे ६.२ मिलियन डॉलर (₹५५ कोटी) देऊन खरेदी करण्यास तयार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विक्रीतून मिळणारी संपूर्ण रक्कम रतन टाटा एंडॉवमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडॉवमेंट ट्रस्टकडे जाणार आहे.






