Monday, December 1, 2025

पदभरती करा अन्यथा पशुवैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द

पदभरती करा अन्यथा पशुवैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द

६० टक्के रिक्त पदांमुळे कारवाईची टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत सहा पशुवैद्यकीय महाविद्यालये, दोन दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालये, तीन मत्स्य विज्ञान महाविद्यालये आणि चार पशुपैदास प्रक्षेत्रे असली तरी या ठिकाणी मंजूर पदांपैकी ६० टक्के पदे रिक्त आहेत. प्रामुख्याने प्राध्यापक संवर्गातील मंजूर ६४ पदांपैकी ६२ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तत्काळ पदभरती न झाल्यास महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची भीती आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि अंतर्गत महाविद्यालयांसाठी विद्यापीठाच्या वतीने २००८ मध्ये पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान शाखेतील शिक्षकवर्गीय संवर्गातील पदे भरली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पशुवैद्यकीय शाखेतील सहाय्यक प्राध्यापक आणि २०१८ मध्ये दुग्ध तंत्रज्ञान शाखेतील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील पदे भरण्यात आली होती. त्यानंतर पदभरतीवर निर्बंध आल्यामुळे विद्यापीठाच्या वतीने पदभरती करण्यात आली नाही. दरम्यानच्या काळात सेवा निवृत्तीमुळे शिक्षकवर्गीय संवर्गातील बहुतांश पदे रिक्त झाली आहेत. परिणामी सद्यस्थितीत एकूण मंजूर पदसंख्येच्या फक्त ४० पदांवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा गाडा हाकला जात आहे.

भारतीय पशुचिकित्सा आयोग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी वेळोवेळी शिक्षकवर्गीय संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले होते. पण, त्यानंतरही मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे. सहयोगी प्राध्यापक संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी १४० पदे रिक्त आहेत. तर सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी १४० पदे रिक्त आहेत.

पदभरती किती टक्के ?

राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय काढून रिक्त असलेल्या पदांच्या ५० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, भारतीय पशुचिकित्सा आयोग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या निकषांनुसार १०० टक्के पद भरती आवश्यक आहे. त्यामुळे पदभरती रिक्त पदांच्या ५० टक्के होणार की, १०० टक्के होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच १०० टक्के पदभरती न झाल्यास पशुवैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची भीती कायम राहणार आहे. एकीकडे रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असतानाच सावळी विहिर, बीड आणि बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला सरकारने मान्यता दिली आहे.

पदभरतीची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयांतील शिक्षकवर्गीय पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. पद भरतीला मान्यता मिळालेली आहे. लवकरच पदभरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली.

Comments
Add Comment