गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्या आणि मानवी संघर्षाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे हा प्रश्न सध्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मुंबईकरांनाही या घटनांची जाणीव चांगलीच आहे. कारण मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातही अशा गोष्टी अधूनमधून घडत असतात. मात्र ग्रामीण भागात बिबट्याची दाहकता खूपच मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली आहे. यातच गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक सेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून ज्या नामदेवराव गुंजाळ यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांच्याशी मुंबईत भेटण्याचा योग आला आणि त्यांच्याकडून या संपूर्ण घटना व त्यांचा अभ्यास पाहिल्यावर थक्क व्हायला झाले. एक शहरी नागरिक म्हणून या बिबट्यांबद्दल एक सुप्त आकर्षण होते, कुतूहल होते. मात्र गुंजाळ यांच्या तोंडातून त्यांचा अभ्यास व त्यावर सुचवलेले उपाय बघितले असता आता खरंच सरकारने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे असे वाटून गेले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत बिबट्यांचा वावर आणि हल्ले यामुळे निर्माण झालेली दहशत आता असह्य पातळीवर पोहोचल्याचे दिसत आहे. विशेषतः पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही हरित पट्टे जसे संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे जीवघेणे झाले आहे. शेतात रात्रभर ठाण मांडणे अशक्य बनले आहे. लहान मुले शाळेत जाण्यास घाबरतात, तर मोठी माणसे घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करतात. या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही प्रचंड आहे. ऊस, कांदा, भाजीपाला, द्राक्ष अशा नगदी पिकांच्या शेतात रात्रंदिवस राबावे लागते. पण बिबट्या आला की सगळे पळापळ होऊन थरकाप उडतो. जनावरे मारली जातात, कुत्रे-मांजरी गायब होतात. शेतकऱ्यांना रात्रभर शेतात थांबणे शक्य नसते. कारण स्वतःच्या जीवाची भीती वाटते. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान होते. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. काहींनी तर शेती सोडून शहराकडे स्थलांतर केले आहे. शिक्षण क्षेत्रावर याचा खोलवर परिणाम झाला आहे. अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ट्युशन, अभ्यासिका बंद झाल्या आहेत. मुलींच्या शाळा, महाविद्यालयात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संध्याकाळनंतर बाहेर पडणे धोकादायक वाटते. काही शाळांनी तर सकाळी उशिरा सुरुवात आणि दुपारी लवकर सुट्टी असे वेळापत्रक बदलले आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे.
आरोग्याच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे बिबट्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना रात्री रुग्णालयात नेणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे रात्री बंद असतात. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येती रात्री अचानक बिघडल्या तर उपचार मिळणे दुरापस्त झाले आहे. मानसिक आरोग्याचा तर पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. भीतीचे सतत दडपण, निद्रानाश, चिडचिड, उदासीनता असे मानसिक आजार वाढीस लागले आहेत. या सगळ्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की, बिबटे हे वन्य प्राणी आहेत त्यांना मारणे किंवा खच्चीकरण करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडेल आणि पुढील काळात मानव वन्यजीव संघर्ष आणखी तीव्र होईल. कारण बिबट्यांच्या पुढच्या पिढीला जंगल नाही तर नागरी वसाहतीचा परिसर हेच आपले आश्रयस्थान आहे असे वाटेल. ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनता यांना जगण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर बिबट्यानाही आपल्या नैसर्गिक अधिवासात निर्भयपणे जगण्याचा अधिकार आहे. दोघांचे सहजीवन शक्य आहे. फक्त त्यासाठी हवी राजकीय इच्छाशक्ती आणि शास्त्रोक्त दृष्टिकोनाची गरज. राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे डोळसपणे पाहण्याची आता गरज आहे. फक्त बिबटे पकडणे किंवा ठार मारणे हा उपाय नव्हे. दीर्घकालीन शास्त्रोक्त आणि मानवी वन्यजीव सहजीवनाला प्रोत्साहन देणारा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. त्यासाठी ग्रामीण जनतेच्या भावनांचा त्यांच्या भीतीचा त्यांच्या दैनंदिन संघर्षाचा खोलवर अभ्यास केला पाहिजे. मुळात ग्रामीण भागात बिबट्या वगैरे असा कोणताही शब्द नसून ग्रामीण भागात त्यांना वाघच म्हणतात. शेवटी वाघ म्हणा का बिबट्या म्हणा शेवटी हल्ला तो करणारच. बिबट्यांच्या दहशतीमुळे प्राणहानीच नव्हे तर शिक्षणावरही मोठा परिणाम होत आहे. शेतकरी कुटुंबे शेतात वस्ती करून राहतात, तर शाळा, कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी असतात. शाळा सुटल्यावर अतिरिक्त क्लासेस अभ्यासाची गरज आणि घरी परतण्याचा उशीर हे सर्व मिळून अंधार पडला की भीतीची छाया दाटते. परिणामी पालक मुलांना क्लासेस सोडायला लावतात, ज्यामुळे ग्रामीण मुले शहरातील स्पर्धेत मागे पडतात. ग्रामीण भागात शिक्षणाची रचना शहरापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. गावात प्राथमिक शिक्षण असले तरी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा किंवा कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे दहा ते वीस किलोमीटर अंतरावर असतात. मुलांना सकाळी सायकलने किंवा बसने जावे लागते. शाळेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असते. आजकालच्या स्पर्धात्मक युगात शाळेतील अभ्यास पुरेसा ठरत नाही यासाठी अतिरिक्त कोचिंग क्लासेस आवश्यक ठरतात. पण ते सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत चालतात. शाळा सुटल्यावर क्लासला जाणे, नोट्स घेणे आणि घरी परतणे यात किमान एक ते दोन तास उशीर होतो. घरी परतण्यासाठी रस्ते खराब, वाहतुकीची सोय कमी आणि मुख्य म्हणजे शेतातून जावे लागते. रस्त्याच्या कडेला ऊस, गवत, फळबागा असतात. वाघ हा शिकारी प्राणी आहे आणि अन्नाच्या शोधात तो गावाच्या जवळ येतोय. अलीकडे वाघाने मनुष्यावर केलेल्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या, ज्यात अनेक बालके बळी पडली आहेत. सायंकाळी ६ नंतर अंधार पडला की वाघ सक्रिय होतो. मुले-मुली एकटे किंवा गटाने परतत असताना हल्ल्याची शक्यता वाढते. कमी उंचीच्या पक्षावर तो सहज हल्ला करतो. एखादी हल्ल्याची घटना घडली की संपूर्ण परिसरात दहशत पसरते. साहजिकच शिक्षणावर परिणाम होतो आणि ड्रॉपआऊटची संख्या वाढते. ग्रामीण भागाची पुढची पिढी जर अशी अंधारात राहिली, तर शेवटी शिक्षण हा प्रकाश आहे आणि तो पोहोचवण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे. डॉक्टर नामदेवराव गुंजाळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने या समस्येवर संशोधन करीत आहेत. त्यांनी स्वतःच्या ग्रामविकास व वन्यजीव संवर्धन संस्थेच्या वतीने असे प्रकल्प तयार केले आहेत. जे बिबट्यांना न मारता व खच्चीकरण न करता त्यांचा मानवी वस्त्यांमध्ये होणारा त्रास कायमस्वरूपी कमी करतील. मुळात या बिबट्यांमुळे आता सामाजिक समस्या निर्माण झाल्यामुळे बिबट्या व मानव संघर्षात न होता व त्यांची तात्पुरती सोय न करता कायमस्वरूपी उपाय हवा हेच खरे आहे. त्यावर समस्या व उपाय पुढील भागात पाहूया!
- अल्पेश म्हात्रे