Monday, December 22, 2025

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला.

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली. बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कोकण विभागअपर आयुक्त फरोग मुकादम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. चैत्यभूमी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त याबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफसफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत नियंत्रण कक्ष, आरोग्यसेवा, रुग्णवाहिका, रेल्वे व्यवस्था, बेस्ट आणि एसटी परिवहन व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक नियोजन या संदर्भातही विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले. बैठकीस कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Comments
Add Comment