Sunday, November 30, 2025

मुंबईतील बीएमसी शाळांमधील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मोफत देणार

मुंबईतील बीएमसी शाळांमधील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मोफत देणार

खासदार पीयूष गोयल यांची घोषणा

मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, बीएमसी शिक्षण विभागाच्या आर-नॉर्थ विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पस (कांदिवली, पूर्व) याचे उद्घाटन उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि मूल्याधारित उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पीयूष गोयल यांनी शीटल विनायकुमार सिंह या विद्यार्थिनीला विशेष निमंत्रित करून त्यांच्या सोबत उद्घाटन करून घेतले, जी या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या हजारो मुलींच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे.

यावेळी गोयल यांनी मुलींच्या सन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांनी घोषणा केली की मुंबईतील सर्व बीएमसी शाळांमधील सुमारे ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४,२०,००० सॅनिटरी पॅड मोफत वितरित केले जातील, जेणेकरून मासिक पाळी स्वच्छतेच्या साधनांच्या कमतरतेमुळे कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये. कार्यक्रमात गोयल यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप केले आणि शाळांमधील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सुरक्षित स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करून देणे हे मुलींच्या आत्मविश्वास, स्वावलंबन आणि अखंड शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पीयूष गोयल यांनी बीएमसी शिक्षण विभागाला ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले, जेणेकरून स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती निर्माण होईल.

Comments
Add Comment