गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप,
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड खटल्यात नवीन गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नव्याने गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये राहुल व सोनिया गांधी यांच्यासह इतर सहा जण आणि तीन कंपन्यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेल्या एजेएल (असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड) कंपनीवर फसवणूक करून कंपनी बळकावण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ईडीने आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांबरोबर शेअर केला होता. पीएमएलएच्या कलम ६६(२) अंतर्गत, ईडी कोणत्याही एजन्सीला अशा प्रकरणांमध्ये तपास अहवाल व पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यास सांगू शकते.'
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
- एफआयआरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख) आणि इतर तीन जणांची नावं आहेत. तसेच एजेएल, यंग इंडियन, डॉटेक्स मर्चंडायज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची देखील नावे आहेत.
- डॉटेक्स ही कोलकातामधील कथित शेल कंपनी असल्याचे ईडीने म्हटले आहे. या कंपनीने यंग इंडियन कंपनीला एक कोटी रुपये दिले होते. या व्यवहाराद्वारे यंग इंडियन कंपनीने काँग्रेसला ५० लाख रुपये देऊन तब्बल २,००० कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या एजेएल कंपनीवर नियंत्रण मिळवलं. एफआयआरमध्ये नमूद असलेल्या तिन्ही कंपन्या कोलकातास्थित बोगस कंपन्या असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस एजेएलच्या भागधारकांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत.






