मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका (सीएचव्ही) आणि आशा सेविकांची बूथ स्तर अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केली. मात्र मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सीएचव्ही व आशा सेविका महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे काम बंधनकारक नाही, असा पवित्रा घेत मुंबईतील ४ हजार ५०० सेविकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करण्यास थेट नकार दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत असलेल्या ४ हजार ५०० स्वयंसेविकांची बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बीएलओ नेमणुकीसाठी दिलेल्या यादीमधील १३ संवर्गांमध्ये सीएचव्ही आणि आशा सेविकांचा समावेश नाही. त्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत. त्याचबरोबर काही सीएचव्ही व आशा सेविका या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे बीएलओ म्हणून नियुक्ती करणे अयोग्य असल्याचा दावा सीएचव्ही व आशा सेविकांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेने निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देऊन सीएचव्ही व आशा सेविकांना बीएलओ म्हणून नेमणूक करून त्यांचा मानसिकदृष्ट्या छळ करीत आहेत. त्यामुळे ही नेमणूक बेकायदेशीर असून, सीएचव्ही व आशा सेविकांवर ती जबरदस्तीने लादण्यात येत आहे, असे सीएचव्ही व आशा सेविकांचे म्हणणे आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बीएलओसाठी नियुक्त करू नये असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक सीएचव्ही व आशा सेविका या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ता म्हणूनही काम करत असतात. त्यामुळे सीएचव्ही व आशा सेविकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करणे म्हणजे निवडणूक आयोगाच्या मार्गर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून मुंबई महानगरपालिका आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना पत्र पाठवून सीएचव्ही व आशा सेविकांची जबरदस्तीने व बेकायदेशीरित्या करण्यात येणारी बीएलओची नेमणूक रद्द करावी, अशी विनंती केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे सीएचव्ही व आशा सेविकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना आर्थिक, मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी पत्राद्वारे केली आहे.






