उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे मानले जाते. आपल्या नृत्याद्वारे त्या देवदेवतांचे मनोरंजन करतात असा उल्लेख आहे. इंद्र यांचा उपयोग आपले शत्रू, विरोधक अथवा स्पर्धकांना पराभूत करण्यासाठी करत असतात. या अप्सरा सांगितलेले कार्य करून स्वर्गात परत येतात असा उल्लेख अनेक पुराणातल्या कथेत आहे. या सर्व अप्सरांमध्ये उर्वशी नावाची अप्सरा सर्वात सुंदर असल्याचे मानले जाते. उर्वशी व पुरुरवाची ही कथा विष्णुपुराण व श्रीमद् भागवत पुराणात आहे.


उर्वशीचा जन्म
ब्रह्मदेवाचे पुत्र धर्म व धर्मपत्नी रुची यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विष्णूंनी त्यांचे पोटी नर व नारायण या नावे अवतार घेतले. बालपणापासूनच ते ध्यान व तप यात लीन असत. एकदा बद्रिकाश्रमात शिवाच्या आराधनेत ते लिप्त होते. त्यांच्या तपश्चर्येने अस्वस्थ झालेल्या इंद्रदेवाने त्यांचा तपोभंग करण्यासाठी रंभा व मेनका या अप्सरांना पाठविले; परंतु त्या अप्सरांचा कोणताही परिणाम नारायणांवर झाला नाही. उलट नारायणांनीच आपल्या उरू म्हणजे जांघेपासून एक सुंदर स्त्री निर्माण केली. जांघेपासून निर्माण झाल्यामुळे तिचे नाव अप्सरा पडले. नारायणांनी तिला इंद्राला भेट दिली. त्यामुळे इंद्र खजिल झाला.


पुरुरवाची जन्मकथा
ब्रह्मदेवाचे पुत्र अत्री यांच्या नेत्रापासून चंद्राचा जन्म झाला. चंद्राला तारापासून बुध नावाच्या पुत्राचा जन्म झाला. विष्णुपुराणानुसार एकदा मनूने पुत्राच्या इच्छिने मित्रावरुण नावांच्या जुळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी एक यज्ञ केला; परंतु संकल्पात काही चूक झाल्याने पुत्र न होता इला नावाची कन्या जन्मली. पुढे मित्रा वरुणाच्या कृपेने या इलेचे पुरुषात रूपांतर झाले. त्याचे नाव सुद्युम्न. हा शिवानी प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात गेल्यामुळे शिवाच्या अवकृपेने पुन्हा स्त्रीत रूपांतर झाला. तिचे नाव इला. या इलेला बुधापासून एक सुदृढ सुंदर व पराक्रमी पूत्र झाला तोच पुरुरवा.


पुरुरवा-उर्वशी कथा
एकदा उर्वशी आपल्या सखीबरोबर भूतलावर विहार करीत असताना एका राक्षसाने तिला पळविले, तेव्हा ती बचावासाठी ओरडू लागली. तिचा आक्रोश एकून जवळच असलेल्या पुरुरवाने तिची राक्षसापासून मुक्तता केली. दोघेही एकमेकांकडे आकर्षिले गेले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुरुरवाने उर्वशीला विवाहाची मागणी घातली. उर्वशीने विवाहसाठी तीन अटी ठेवल्या. १) तिचे दोन आवडते मेंढे आहेत. ते रात्रंदिवस तिच्यासोबत राहतील. त्यांची काळजी पुरुरवाने घ्यावी. २) उर्वशी नेहमी तूप पिऊनच राहील. ३) पुरुरवा कधीही विवस्त्र अवस्थेत तिच्या नजरेस पडता कामा नये. पडल्यास ती तक्षणीच निघून जाईल. पुरुरवाने या तीनही अटी मान्य केल्या. दोघांचा विवाह झाला व दोघेही आनंदाने कालक्रमणा करू लागले.


उर्वशी अप्सरा असूनही पृथ्वीवर एका मनुष्यासोबत राहते या बाबीचा इंद्राला फार राग आला. तिला परत आणण्यासाठी त्याने एक कारस्थान रचले. विश्वावसू नावाच्या गंधर्वाला उर्वशीच्या पलंगापाशी सतत असणारी मेंढे पळवून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे एके रात्री उर्वशी व पुरुरवा एकांतात असताना विश्वावसूने मेंढे पळविले. त्या मेंढ्यांचे ओरडणे एकूण उर्वशीने पुरुरवाला उठविले. गडबडीत पुरुरवा तलवार घेऊन ताबडतोब गंधर्वाच्या मागे लागला तोच गंधर्वाने आकाशात वीज चमकविली व त्या विजेच्या प्रकाशात विवस्त्र अवस्थेतील पुरुरवा उर्वशीच्या नजरेस पडला व अटींचे पालन न झाल्याने उर्वशी स्वर्गात निघून गेली. त्यावेळी ती गरोदर होती. स्वर्गात जाऊन तिने पुरुरवाच्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव आयू.


उर्वशी स्वर्गात गेली तरी तिचे मन पुरुरवातच गुंतले होते, तर इकडे पृथ्वीवर पुरुरवा उर्वशीच्या शोधात वेड्यासारखा इकडे-तिकडे भटकू लागला. असाच भटकत असताना एकदा कूरूक्षेत्रातील सरोवरात त्याला उर्वशी तिच्या सखींबरोबर दिसली. तिला पाहताच पुरुरवाने तिला आपल्यासोबत चलण्याची विनंती केली. तेव्हा उर्वशीने पुरुरवाला म्हटले ‘प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र मी तुझ्या संगतीत राहीन तेव्हा तुला आणखीही मुले होतील’ पण जर तू गंधर्वाची स्तुती करशील, तर ते मला तुझ्याकडे कायम सोपवतील असे म्हटले. त्याप्रमाणे पुरुरवाने गंधर्वाची स्तुती केली. प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले. उर्वशीच्या प्राप्तीसाठी या पात्रात यज्ञ कर असे सांगितले. ते पाहून पुरुरवा समाधानाने परतला; परंतु जाताना तो ते पात्र घेण्याचे विसरून गेला.


काही कालावधीनंतर आठवण येताच तो पुन्हा त्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी पात्राऐवजी एक पिंपळाचे रोप उगवलेले दिसले. पुरुरवा ते रोप घेऊन घरी आला व त्याने त्याच्या खोडापासून दोन अरणी (मंथन करण्याची लाकडे) तयार केल्या व नंतर वरच्या अरणीला पूर्व व खालच्या अरणीला उर्वशी आणि मधल्या लाकडाला पुत्र असे मानून अग्नी प्रज्वलित करणाऱ्या मंत्रांनी मंथन केले. या मंथनामुळे जातवेदा नावाचा अग्नी प्रकट झाला. पुरुरवाने अग्नीदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागांत विभागणी केली व त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला. या तीन अग्नीच्याद्वारे पुरुरवाने भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला. परिणाम स्वरूप पुरुरवा गंधर्व बननू गंधर्व लोकात उर्वशीसह कायम राहिला.


सत्ययुगात ॐकार हा एकच वेद होता, तसेच अग्नीही एकच होता; परंतु त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरुरवापासूनच तीन वेद आणि तीन अग्नी यांचा अंतर्भाव झाला.

Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,