वैदर्भियांचे लक्ष वेधून घेणारे दोन कार्यक्रम

अविनाश पाठक

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा माहोल असताना नागपुरात मात्र दोन इव्हेंट्स चांगलेच गाजलेले आहेत. त्यातील एक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून उभारले गेलेले ॲॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शन आणि दुसरा इव्हेंट म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टतर्फे आयोजित नागपूर उत्सव पुस्तक महोत्सव हे पुस्तकांचे प्रदर्शन. विशेष म्हणजे ही दोन्ही प्रदर्शने फक्त प्रदर्शनी नसून तिथे त्या त्या विषयातील भाषणांचा देखील आनंद नागरिकांना मिळतो आहे.


नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील एक कल्पक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये गडकरी राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाले. तेव्हापासून विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था ते बघत होते. १९९९ मध्ये ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले. तिथे त्यांनी या समस्येचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवे या विचारातून त्यांनी २००७-०८ या काळात नागपुरात अॅग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करायला सुरुवात केली. त्यात देशभरातील कृषीविषयक संशोधन संस्था आणि कृषी उद्योगांचे स्टॉल्स लावले जात होते आणि त्याचबरोबर प्रदर्शनीच्या काळात दिवसभर विविध विषयांवर कृषी विषयक तज्ज्ञांची अभ्यासपूर्ण भाषणे असणाऱ्या कार्यशाळा देखील शेतकऱ्यांसाठी आयोजित केल्या जात होत्या. त्याला शेतकऱ्यांकडून दरवर्षी वाढताच प्रतिसाद मिळत होता. कोरोना काळातील दोन वर्षे सोडता सातत्याने दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनाचे सोळावे वर्षं आहे. सुरुवातीला हे प्रदर्शन रेशीमबाग मैदानावर आयोजित केले जात होते. आता ते नागपूरला अधिकच नजीकच्या दाभा परिसरात आयोजित केले जाते. यंदा या ॲग्रो व्हिजन प्रदर्शनाचे आयोजन २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आले होते. २१ नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी नागपुरात ७० कोटींचे संत्रा क्लीन प्लांट सेंटर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शिवराज सिंह चव्हाण यांनी केली. चांगल्या नर्सरींचा शोध घेत मोठ्या नर्सरींना चार कोटींपर्यंत तर मध्यम नर्सरींना दोन कोटींपर्यंत अर्थसहाय्य करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी पशुखाद्य प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन देखील शिवराजसिंह चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.


यंदाचे अॅग्रो व्हिजन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले. कृषी प्रदर्शनात अॅग्रो टुरिझम, संत्रा, लिंबू फळ रोपवाटिका, पुर्ती गॅस अंकूर सीड्स भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक खतांचे स्टॉल्स अत्याधुनिक शेती अवजारांचे स्टॉल्स इत्यादींवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागपूर जवळच्या धापेवाडा टेक्स्टाईल उद्योगाने तयार केलेल्या सिल्क साड्यांना येथे मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले. संत्रा उत्पादकांच्या स्टॉलवरही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. दुग्धोत्पादन, कृषी मालावर प्रक्रिया आणि निर्यातीला उत्तेजन देणारे स्टॉल्स येथेही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या निमित्तानेच फॉडर मॅनेजमेंट न्यू टेक्नॉलॉजी अॅण्ड प्रोसेसिंग इंडस्ट्री या विषयावर परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. येथे डेअरी या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र शासन व मदर डेअरीच्या विविध योजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. यालाच जोडून राष्ट्रीय तेलबिया अभियान आणि एकात्मिक वैज्ञानिक मधमाशी पालन या विषयावरही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात देखील मान्यवर अभ्यासकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या निमित्ताने अॅग्रो व्हिजन फाऊंडेशन, नॅशनल ब्युरो ऑफ सोईल सर्वे अॅण्ड लॅण्ड युज प्लॅनिंग आणि बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात आज विदर्भाच्या शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचे सुलभ मार्गदर्शन देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला या करारा अंतर्गत तूर, उस आणि संत्रा पिकासाठी सखोल ज्ञान प्राप्त करून त्यानंतर एकत्रित सहकार्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी काम करण्यात येणार आहे. हे प्रयोग यशस्वी झाल्यावर विविध पिकांना त्यात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामती ट्रस्टचे प्रताप पवार पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना विकासाचा हट्ट धरावा लागेल असे प्रतिपादन प्रताप पवार यांनी यावेळी बोलताना केले.


चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनांमध्ये विविध कार्यशाळांमध्ये तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. येथे लाखो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. आता ॲग्रो व्हिजन फक्त वर्षातून एकदा प्रदर्शन आयोजित करणार नाही, तर वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित करेल अशी घोषणा अॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावती मार्गावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्राउंडवर तयार होत असलेल्या कन्वेंशन सेंटरमध्ये हे कार्यक्रम नियमितपणे होत जातील असे त्यांनी सांगितले. एकूणच हे प्रदर्शन आणि तीन दिवस झालेली तज्ज्ञांची भाषणे आणि झालेल्या कार्यशाळा यामुळे अॅग्रो व्हिजन यंदाही चर्चेचा विषय ठरले होते. नागपूर विदर्भात चर्चेचा विषय ठरणारा दुसरा इव्हेंट म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टतर्फे आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव. रेशीमबाग मैदानावर झालेल्या या प्रदर्शनात तीनशे प्रकाशकांनी आपले स्टॉल्स लावले आहेत.


त्यात १५ लाखांहून अधिक विविध विषयांची पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी यावेळी दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते झाले. ज्ञानाचे भंडार वाढवण्यासाठी ग्रंथांचेच वाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृती हा मनोरंजनाचा विषय नव्हे, तर ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो. वाचण्याची सवय असल्यास आपले विचार बदलतात नव्या कल्पना सुचतात आपल्या समाजमनावर चांगल्या पुस्तकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळेच ज्ञानाचे भांडार वाढवण्यासाठी पुस्तके गरजेची आहेत असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी केले. याच प्रदर्शनात झिरो माइल लिटरेचर फेस्टिवलचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले. आजच्या गुगलच्या जीपीटी एआयच्या युगात माहिती ज्ञानामध्ये परिवर्तित होत नाही. तोवर ती केवळ माहिती असते. त्यामुळे माहितीकडून ज्ञानाकडे जायचे असेल आणि ज्ञानी म्हणून नावलौकिक मिळवायचा असेल, तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. तरुण पिढीपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचवण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी प्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख हे देखील उपस्थित होते.



नागपूर पुस्तक महोत्सवात या झिरो माइल लिटरेचर फेस्टिवलमध्ये दररोज मान्यवर साहित्यिकांच्या मुलाखती आयोजित केल्या जात आहेत. त्यात सुनील आंबेकर, प्रवीण तरडे, लखन सिंह कटरे, शेफाली वैद्य यांच्यासह इतर मान्यवरांच्या मुलाखती आणि भाषणांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे तरुण लेखक लेखिकांची संवाद साधणार आहेत. २९नोव्हेंबर रोजी या पुस्तक महोत्सव आणि प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. आतापर्यंत फक्त नागपूरच नव्हे, तर विदर्भातून मोठ्या संख्येत नागरिकांनी आणि त्यातही तरुणाईने या प्रदर्शनाला भेट दिली असून पुस्तके देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. एकूणच हा पुस्तक महोत्सव देखील नागपूरकरांचे आकर्षण ठरलेला दिसत आहे.

Comments
Add Comment

मतदार जागृती हवी

रवींद्र तांबे भारतीय संविधानाचे कलम ३२६ मध्ये सुधारणा करून २१ वर्षांवरून १८ वर्षं पूर्ण झालेल्या नागरिकांना

मराठवाड्यात खासदार, आमदारांची सत्त्वपरीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सध्या राजकीय रंगत भरली आहे.

तपोवनाबाहेर झाडे लावता येतील, साधुग्राम उभारता येईल?

वृक्षतोडी प्रकरणी भाजपचे नाशिकमधील तीनही आमदार किंवा इतर पदाधिकारी भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. मात्र

पुणे जिल्ह्यात युतीत ‘फूट’, आघाडीत ‘बिघाडी’

पुणे जिह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील राजकीय तापमान

अयोध्येवर भगव्याची शोभा

आजु सफल तपु तीरथ त्यागू, आजु सफल जप जोग बिरागू, सफल सकल सुभ साधन साजू, राम तुम्हहि अवलोकत आजू...अनेक शतकांपासूनच्या

दोन्ही राष्ट्रवादींची युती : पालकमंत्र्यांची सुस्ती

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक साम्य दिसत