Monday, December 29, 2025

विवाहादरम्यान सहा लाखांचे दागिने चोरीला

विवाहादरम्यान सहा लाखांचे दागिने चोरीला
पुणे (प्रतिनिधी) : बाणेर येथील मंगल कार्यालयात विवाहादरम्यान चोरट्यांनी दागिन्यांची पिशवी चोरून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ २५ नोव्हेंबर रोजी बाणेर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांनी एका टेबलवर गडबडीत दागिन्यांची पिशवी ठेवली. पिशवीत सोन्याचे दागिने, एक लाख ३० हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज होता. चोरट्यांनी संधी साधून पिशवी चोरली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत. दरम्यान, विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर परिसरातही अशीच घटना घडली होती.
Comments
Add Comment