महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयआयटी बॉम्बे आणि महानगरपालिका या तीनही यंत्रणांची यंत्र हवेची गुणवत्ता तपासत असतात. पण, दुर्दैवाने त्यात कुठेही सुसूत्रता दिसत नाही. अनेक यंत्र एकतर नादुरुस्त किंवा बंदच आहेत की काय कोणास ठाऊक? कारण, या यंत्रणांच्या अनेक केंद्रांवरची हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी या महत्त्वाच्या दिवसांतही उपलब्ध नाही! याच यंत्रणेला न्यायालयाने आता सर्व बांधकामांच्या ठिकाणी हवेची शुद्धता मापक यंत्र बसवण्याचे आदेश दिले आहेत. बांधकामांच्या ठिकाणांची हवेची गुणवत्ता तपासा, जिथे हवा धोक्याच्या पातळीपर्यंत प्रदूषित असेल, तिथली बांधकामं तातडीने काही काळ थांबवा, असं न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे. हे आदेश देताना अर्थात प्रकल्पाच्या आर्थिक गणिताचा विचार करायची सूचनाही केली आहे. न्यायालयाने दाखवलेली ही काळजी यंत्रणांसाठी (आणि संबंधित कंत्राटदारांसाठीही) पळवाट म्हणून उपयोगाला येईल, यात शंका नाही. दिल्लीतलं वायू प्रदूषण कमी दाखवण्यासाठी तिथल्या यंत्रणांनी हवेच्या गुणवत्ता मापक यंत्रांच्या भोवती पाणी मारण्यासाठी कसे टँकर लावले होते, हे आपण पाहिलेच आहेत. असे उपाय जे करतात, तेही याच प्रदूषित हवेतून श्वास घेतात. त्यांची कुटुंबही याच हवेतून प्राणवायू मिळवत असतात. पण, आपल्याकडे स्वतःच्या आणि इतरांच्या जगण्याच्या गुणवत्तेचा विचारच नसल्याने केवळ काही अामिषापोटी अशा गोष्टी केल्या जातात. आपण आपल्याबरोबरच इतरांचं आरोग्यही पणाला लावतो आहोत, याची जाणीव यांना नसते. त्यामुळे, मुंबईतही वेगळं काही घडेल, असं मानायला मन धजावत नाही. दिल्लीच्या वायू प्रदूषणाची तक्रार वर्षानुवर्ष आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब अशा जवळच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातलं धसकट पेटवल्याने होणाऱ्या धुराने दिल्लीतली हवा बिघडते, असं वर्षानुवर्ष सांगितल्यानंतर यावर्षी या यंत्रणांनी वाहनांच्या वाढत्या उत्सर्जनाने हे प्रदूषण होतं आहे, असं सांगायला सुरुवात केली आहे. दिल्लीत घरात हवा शुद्ध करणारी यंत्र लागली आहेत. लोक ऑक्सिजनची पिशवी घेऊन, त्याची नळी नाकाला लावून फिरत नाहीत. पण ते दिवसही फार दूर नसतील. दिल्लीशी स्पर्धा करणाऱ्या मुंबईतही वेगळं काही घडणार नाही. समुद्रकिनारी असल्याचा फायदा नेहमी मिळत राहीलच असं नाही. ला निनाच्या प्रभावाने वाऱ्याच्या दिशा सतत बदलत आहेत. हे वारेच मुंबईचा श्वास कोंडल्याशिवाय राहणार नाहीत!
महापालिकेने सध्या मुंबईतल्या वायू प्रदूषणाचं खापर शहरातील बांधकामांवर फोडलं असलं तरी ते एकमेव कारण नाही. कारवाईला जे सोपं असतं, ते कारण नेहमी पुढे केलं जातं. मुंबईतल्या प्रदूषणाला कारण वाहतूक कोंडीच आहे. सार्वजनिक व्यवस्था पंगू केल्याने मुंबईकरांना रोजच्या प्रवासासाठी खासगी गाड्या किंवा भाड्याने रिक्षा-टॅक्सी वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुंबई वाढते आहे आणि मुंबईची आदर्शवत 'बेस्ट' सेवा रोडावते आहे. या सेवेच्या गाड्यांमध्ये वर्षागणिक वाढ व्हायला हवी होती, जुन्या मार्गांचे विस्तार व्हायला हवे होते, नवे मार्ग सुरू व्हायला हवे होते. प्रत्यक्षात यातलं काहीच होत नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणांनी मार्गावर बस चालणं अवघड झालं आहे. ही सेवा उलट्या पायाने पळते आहे! त्यामुळे, मुंबईत गेल्या दहा वर्षांत चारचाकी वाहनांमध्ये तिप्पट आणि दुचाकींमध्ये पाचपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. रिक्षा-टॅक्सी बहुतांश सीएनजीवर चालताहेत. पण, सीएनजीसाठी त्यांना लांबच लांब रांगा लावाव्या लागताहेत. अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट, तर इतका आहे, की त्यांची संख्या एकूण संख्येच्या ३० टक्क्यांएवढी असावी, असा अंदाज आहे. मेट्रोच्या वापराचे आकडे जाहीर होतच असतात. तात्पर्य, मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाहतुकीची गुणवत्ता सुधारल्याशिवाय शक्य नाही. ती सुधारणं महापालिकेला सहज शक्य आहे. त्यांनी ही जबाबदारी आपली मानली तर!