नागरिकांना सहकार्य करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने, प्रभाग प्रारुप मतदार यादीत एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधित मतदाराशी प्रत्यक्ष घरोघरी (डोअर टू डोअर) संपर्क साधला जात आहे. या अनुषंगाने, संबंधित मतदारांच्या घरी, गृहनिर्माण संस्थांमध्ये येणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), निवडणूक कामकाजविषयक कर्मचारी-अधिकाऱ्यांना अशा मतदारांसह गृहनिर्माण सोसायट्यांकडून सहकार्य केले जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या नावांसमोर ‘**’ (दोन तारे) अशी खूण करुन प्रभाग प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, प्रारुप यादीतील एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांबाबत तपासणी करुन ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या, यासाठी मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र यांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. त्यात साम्य आढळल्यास संबंधित मतदाराशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेतली जात आहे. तसेच, संबंधित मतदार प्रत्यक्षात एकच व्यक्ती असल्याची खात्री पटल्यानंतर ते नेमक्या कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज घेतला जात आहे. त्यानंतर संबंधितास इच्छेप्रमाणे मतदान करण्यासाठी प्रभागातील मतदान केंद्र निश्चित करुन देण्यात येणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), निवडणूक कामकाजविषयक नेमलेले कर्मचारी-अधिकारी हे संबंधित मतदारांशी प्रत्यक्ष घरोघरी (डोअर टू डोअर) जाऊन संपर्क साधत आहे. त्यामुळे, काही व्यक्तीं, गृहनिर्माण संस्थांकडून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, प्रभाग प्रारुप मतदार यादीतील एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांच्या पडताळणीसाठी आपल्या घरी, गृहनिर्माण संस्थांमध्ये येणाऱ्या निवडणूक कामकाजविषयक अधिकारी-कर्मचारी यांना सहकार्य करावे. यासंदंर्भात संबंधित गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांना प्रशासनाकडून लवकरच पत्र जारी करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.






