पुणे : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रेल्वेतील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. रेल्वेच्या डब्यात प्रवासादरम्यान काहीजण अनोख्या कल्पना अमलात आणतात, मात्र यापैकी काही कृती धोकादायकही ठरू शकतात. अशाच एक प्रकार मध्य रेल्वेच्या एका एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडला आणि त्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला ट्रेनच्या चार्जिंग पॉइंटमध्ये इलेक्ट्रिक किटली लावून त्यात मॅगी बनवताना दिसते. विशेष म्हणजे, याच किटलीत तिने यापूर्वी सुमारे १५ प्रवाशांसाठी चहा तयार केला होता. प्रवासात अन्न शिजवणे, तेही ट्रेनमधील वीजपुरवठ्याचा वापर करून, हे नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हँडलवरून कठोर इशारा देण्यात आला आहे. रेल्वेने स्पष्ट सांगितले की, ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक किटली किंवा कोणतेही हाय-व्होल्टेज उपकरण वापरण्यास मनाई आहे. अशा वस्तूंमुळे स्पार्क होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात. अशी कृती ही केवळ असुरक्षितच नाही तर कायद्याने गुन्हा आहे.
व्हिडिओतील महिलेची ओळख पटल्यानंतर रेल्वे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून तिला ताब्यात घेतले. तिच्याविरोधात भारतीय रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १५४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा कलम निष्काळजी कृतीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबाबत आहे.
यासंदर्भात महिलेने पुढे येऊन माफी मागितली असून, तिचा उद्देश कोणालाही धोका निर्माण करण्याचा नव्हता, असे तिने स्पष्ट केले. तसेच इतरांनीही असे स्टंट करू नयेत, असे आवाहन तिने केले आहे.
रेल्वेच्या नियमानुसार : ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवणे प्रतिबंधित आहे. चार्जिंग सॉकेटचा वापर केवळ मोबाइल, लॅपटॉपसारख्या कमी वीजेच्या उपकरणांसाठीच केला जाऊ शकतो. स्टोव्ह, चूल, लहान कुकिंग उपकरणे किंवा जास्त वीज खेचणारी साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.






