अनधिकृत इमारतही केली अधिकृत, माजी आयुक्त, नगररचना संचालकांविरोधात गुन्हे
पालघर : वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन हडप करून खासगी कंपनीच्या नावे केली. तसेच राजकीय वरदहस्त असलेल्या एका स्थानिक नेत्याची अनधिकृत इमारतसुद्धा नियमित करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात चौकशीअंती बुधवारी वसई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणूक, बनावट दस्तएवेज तयार करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित कंपनीचे व्यवस्थापक संचालक माजी नगरसेवक जमील शेख, तत्कालीन महापालिका आयुक्त, तत्कालीन उपायुक्त, नगररचना संचालक, वास्तुविशारद, पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक यांचा समावेश आहे.
वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे जागा आहे. या जागेचा सातबारा उतारा सर्वेक्षण क्रमांक ९ ब अंतर्गत शासकीय जमीन पोलीस विभागाच्या नावे आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्याची अथवा पालिकेची कोणतीही विनापरवानगी न घेता अनधिकृत रस्ता तयार करण्यात आला असून तो ग्रॅड लॉजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नगररचना अधिनियम अंतर्गत रस्ता निष्कासित करून संबंधित विभागांना हस्तांतरण करणे बंधनकारक होते. मात्र गैरमार्गाने दस्तऐवज तयार करून ते पोलिस विभाग, विभागीय आयुक्त, नगरपालिकेचे प्रशासन आणि कोकण विभागाकडे सादर करून दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी सुकेशीनी कांबळे यांनी तक्रार करून पाठपुरावा सुरू केला होता. हा घोटाळा करण्यासाठी वसई पोलीस ठाण्याच्या मूळ नकाशा देखील गायब करण्यात आला होता. त्यावर अनेक आंदोलने, तक्रारी देखील झाल्या. त्या प्रकरणी पोलिसांतर्फे चौकशी सुरू होती. चौकशी अंती आणि १० वर्षांच्या पाठपुराव्या नंतर अखेर वसई पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तयार करण्यात आलेला अनधिकृत रस्ता माजी स्वीकृत नगरसेवक जमील शेख यांच्या खासगी निवासस्थानी जाण्यासाठी आहे. त्यांचे खासगी निवास्थान सर्वे क्रमांक ११ अ आणि ब या जागेत आहे. मात्र त्याला लागूनच वसईचा ऐतिहासिक किल्ला असून वसई किल्ल्याच्या परिसरात हे बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते देखील त्यावेळी नियमित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस आयुक्तालयातील वसई विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोरगे यांच्या फिर्यादीनंतर पोलीस ठाण्याची जागा हडपून अनधिकृत रस्ता तयार करणे आणि अनधिकृत निवासी बांधकाम नियमित करणे या प्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी सभापती अफीफ शेख यांचे वडील जमील शेख आणि त्यांच्या ग्रॅड लॉंजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक संचालक- सदस्य, छोटू बिस्मिला शेख, वास्तुविशारद संजय नारंग त्यांचे अन्य साथीदार, वसई विरार महानगरपालिकेचे सन २०१६ ते २०१७ या कालावधीत कार्यरत तत्कालीन आयुक्त, तत्कालीन उपायुक्त, तत्कालीन नगररचना संचालक, तत्कालीन प्रभाग समिती आय सहा. आयुक्त तसेच पुरातत्त्व विभागाचे सन २०१५ मधील कार्यरत तत्कालीन अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






