रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या २-० अशा पराभवानंतर भारतीय संघ आता वनडे सामन्यांसाठी रांचीमध्ये दाखल झाला आहे. रांचीत ३० नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडिया हॉटेलवर पोहोचली असली, तरी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र अद्याप आलेला नाही. गंभीर अनुपस्थित असतानाच भारतीय खेळाडू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फार्महाऊसला भेट देण्यासाठी गेले.
रांचीमध्ये धोनीच्या फार्महाऊसवर भारतीय खेळाडूंसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह बहुतेक वरिष्ठ खेळाडूंनी धोनीची भेट घेतली असून टीमचा कोच गंभीर मात्र या वेळी गैरहजर होता.
धोनी आणि गंभीर यांच्यातील जुन्या वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे. याआधी २०११ च्या विश्वविजयानंतर गंभीरने अनेकदा अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेमुळे दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा वारंवार झाली. ‘वर्ल्ड कप केवळ एका सिक्समुळे नव्हे, तर संपूर्ण संघाच्या कामगिरीमुळे जिंकला’ असे गंभीरचे मत त्या काळात चर्चेत आले होते.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज हरल्यानंतर गंभीरवर चाहत्यांचा रोष वाढला आहे. गुवाहाटीतील पराभवानंतर स्टेडियममध्ये गंभीरविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्याला पदावरून दूर करावे, अशी मागणीही झाली. या प्रतिक्रियांबाबत विचारले असता, आपल्या पदाबाबतचा निर्णय बीसीसीआय घेईल, मी टीमपेक्षा मोठा नाही, असे गंभीरने सांगितले. तसेच आपल्या कार्यकाळात भारताने इंग्लंड सीरिज २-२ अशी बरोबरीत सोडवली, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले, हेही त्याने स्पष्ट केले.






