मुंबई : कुर्ला बस स्थानकावर अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आनंद बाळू जाधव याला विशेष पोक्सो न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश पी. एन. राव यांनी दिलेल्या निकालात पीडित मुलाची साक्ष विश्वासार्ह ठरली असून तीच गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेशी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने म्हटले की पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमध्ये पीडिताची साक्षदेखील ठोस पुरावा ठरू शकते. आरोपीने मुलावर लैंगिक हेतूने अयोग्य स्पर्श केला आणि अश्लील शब्द वापरल्याचे न्यायालयाला पटले.
जाधव याला पोक्सो कायद्याच्या कलम ८ (लैंगिक अत्याचार) आणि कलम १२ (लैंगिक छळ) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. तसेच आरोपीने खटल्यादरम्यान तुरुंगात घालवलेले ११ महिने १३ दिवस शिक्षेत समायोजित करण्यात आले. पीडित मुलाला नुकसानभरपाई देण्यासाठी प्रकरण जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले.
विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी आठ साक्षीदारांच्या साक्षी सादर करत आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध केले. यात मुलगा, त्याची आई, पोलिस अधिकारी आणि शाळेतील कर्मचारी यांचा समावेश होता. शाळेच्या नोंदी आणि अधिकारी यांच्या साक्षीतून मुलाचे वय १४ वर्षे असल्याची खात्री पटली.
३ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास मुलगा बसची वाट पाहत असताना आरोपी त्याच्याजवळ आला आणि पैशांचे आमिष दाखवत अश्लील वर्तन केले. घाबरलेला मुलगा सरळ जवळच्या पोलिस चौकीकडे धावला. आरोपी त्याचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जाधवला पकडले आणि कुर्ला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.






