मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत काढण्यात आली. त्यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ साठीच्या एकूण २२७ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता ६१ जागा राखीव झाल्या. तर, एकूण २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. यापैकी ८ जागा अनुसूचित जाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती, ३१ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तर ७४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या २९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आदेशान्वये, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.