मराठवाड्यात खासदार, आमदारांची सत्त्वपरीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सध्या राजकीय रंगत भरली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक आपल्याच पक्षाचे निवडून यावेत यासाठी सत्ताधारी पक्षातील भाजप, एकनाथ शिंदे गट तसेच अजित पवार गटाने कंबर कसली आहे. याविरुद्ध विरोधी पक्षांत असलेल्या काँग्रेस व उबाठा गटाने देखील यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील प्रचार सभा तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील प्रचार सभा लक्षवेधक ठरली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील सर्वच भाजप उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे. अयोध्येत पार पडलेल्या धर्मध्वज सोहळ्याचा फायदा देखील मोठ्या प्रमाणात भाजपला मिळणार आहे. अयोध्येतील कार्यक्रमामुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित राष्ट्राविषयीच्या भूमिकेमुळे भाजपचे संख्याबळ मराठवाड्यात निश्चितच वाढणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या विकासासाठी असलेली भूमिका प्रत्येक प्रचार सभेतून स्पष्ट केली जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी तसेच विविध नेत्यांनी मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून यावेत यासाठी सूक्ष्म नियोजन करीत पक्षाचे कार्य व विकासाची दिशा स्पष्ट करत मतदारांकडे आपली भूमिका मांडली. याचबरोबर राज्यात सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठवाड्यात विशेष लक्ष केंद्रित केले. मराठवाड्यातील धाराशिव तसेच नांदेड जिल्ह्यात त्यांच्या विक्रमी सभा पार पडल्या. आपल्याकडे तिजोरीची चावी आहे, असे सांगत त्यांनी मतदारांना आकर्षित केले. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठवाड्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत असे आदेश त्यांच्या सहकारी मंत्र्यांना दिले आहेत. त्या दृष्टीने राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाड्यात आपली शक्ती पणाला लावली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील सभेत भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेली टीका राज्यभर गाजत आहे. खासदार अशोक चव्हाण हे अन्न खातात की नाही, असा प्रश्न आपल्याला पडला आहे, अशी टीका करून त्यांच्याकडे असलेल्या भरमसाट एजन्सीचा पाढाच वाचला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांनी मते मिळविण्यासाठी टीकेची झोड उठवली आहे. प्रत्यक्षात भाजपवर टीका न करता त्या पक्षातील नेत्यांना रडारवर ठेवले जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या सभेत अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध बोलत त्यांनी नांदेड जिल्ह्यात सभा गाजवली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ग्रामीण भागातील नाळ पक्की करण्यावर जोर दिला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. परभणी जिल्ह्याच्या नेत्या तसेच भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यादेखील भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांच्या तोडीला असलेल्या उबाठा गटातील नेत्यांनी त्यांना जेरीस आणले आहे. बीड जिल्ह्यातील मंत्री पंकजा मुंडे यांची देखील कसोटी पणाला लागली आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या काही संवेदनशील भागातील मतदान प्रक्रिया रखडली जाण्याची भीती काही राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने पावले उचलली आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सभा घेतल्या. एकेकाळी मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा मोठा गड होता. या दोन्ही जिल्ह्यांनी महाराष्ट्राला एकेकाळी मुख्यमंत्रीपद दिले होते. काँग्रेसच्या कोट्यातून मुख्यमंत्रीपद घेतलेल्या नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था भरून काढण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतःच्या पक्षातील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत. मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यात उबाठा गटाचे वर्चस्व आहे.


या ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांच्या पक्षातील खासदारांनी मोठी शक्ती पणाला लावली आहे. एकंदरीत मराठवाड्यातील भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट व सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांची व खासदारांची मोठी राजकीय कसोटी आहे. नगर परिषद तसेच नगरपंचायतसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आहे. तसेच लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. आपल्या पक्षातील उमेदवारांच्या पारड्यात मते पडावीत, यासाठी मराठवाड्यात सत्ताधारी पक्षातील आमदार एकमेकांच्या विरुद्ध बोलून मत मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची स्पष्ट भूमिका भाजपच्या विजयासाठी फायदेशीर ठरणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या स्पष्ट भूमिका जनतेच्या हिताच्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यात भाजपकडे ओढा असलेले मतदार जास्त संख्येने आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मराठवाड्याला भरभरून निधी मिळालेला आहे. त्यामुळे त्या निधीने मराठवाड्याचा कायापालट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक हे भाजपचेच असतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत असलेल्या आमदारांचीच ही खरी कसोटी आहे. आपल्या पक्षातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले तर आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते आपली किंमत करतील, या भावनेतून आमदार मंडळी देखील मराठवाड्यात कामाला लागलेली आहेत.


- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment

तपोवनाबाहेर झाडे लावता येतील, साधुग्राम उभारता येईल?

वृक्षतोडी प्रकरणी भाजपचे नाशिकमधील तीनही आमदार किंवा इतर पदाधिकारी भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. मात्र

पुणे जिल्ह्यात युतीत ‘फूट’, आघाडीत ‘बिघाडी’

पुणे जिह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील राजकीय तापमान

अयोध्येवर भगव्याची शोभा

आजु सफल तपु तीरथ त्यागू, आजु सफल जप जोग बिरागू, सफल सकल सुभ साधन साजू, राम तुम्हहि अवलोकत आजू...अनेक शतकांपासूनच्या

दोन्ही राष्ट्रवादींची युती : पालकमंत्र्यांची सुस्ती

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक साम्य दिसत

कोकणातली निवडणूक...!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या की, साहजिकच त्या निवडणुका गाव असो की, शहर त्या-त्या भागातील

पर्यटनातून कोकणच्या अर्थकारणाला गती

- रवींद्र तांबे कोकण आणि पर्यटन यांचे एक अतूट असे नाते आहे. येथील ऐतिहासिक गड-किल्ले आणि तेवढेच विलोभनीय