Friday, November 28, 2025

एल्फिन्स्टन पूल पाडकामाला वेग; मध्य रेल्वेवर १८ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

एल्फिन्स्टन पूल पाडकामाला वेग; मध्य रेल्वेवर १८ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

मुंबई : मुंबईच्या प्रवासाला साक्षी राहिलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोडवरील तब्बल १२५ वर्षे जुना पूल आता इतिहासजमा होत आहे. वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी या जुन्या पुलाचे पाडकाम सुरू केले असून पुलाचा पूर्व आणि पश्चिम भाग आधीच पाडण्यात आला आहे. हा पूल पाडून त्याच्याजागी मुंबईतील पहिला डबल डेकर ब्रीज बांधण्यात येणार आहे. हा डबल डेकर ब्रीज रस्ते वाहतुकीसाठी असणार आहे. या पुलाचा एक डेक हा स्थानिक वाहतुकीसाठी असणार आहे तर दुसरा डेक वरळी आणि शिवडी दरम्यानची वाहतूक अधिक वेगवान व्हावी यासाठी उभारण्यात येणार आहे. जुन्या एल्फिन्स्टन ब्रिजचा रेल्वे मार्गिकेवर उभा असलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम गेल्या महिनाभरापासून रखडले होते. या कामासाठी आता मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक घेण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

'महारेल'कडून वारंवार विनंती केल्यानंतर मध्य रेल्वेने अखेर एकूण आठ ब्लॉक्स देण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यातील एक ब्लॉक सलग १८ तासांचा असणार असून उर्वरित सात ब्लॉक्स प्रत्येकी दोन तासांचे असतील. दोन तासांचे ब्लॉक दररोज रात्री १२ ते पहाटे ३ या वेळेत घेण्यात येणार आहेत.

एल्फिन्स्टन पुलाखालूनच उपनगरीय लोकल्स तसेच सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या धावत असल्याने या ब्लॉक्सचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. रेल्वेच्या १८ तासांच्या ब्लॉकदरम्यान लोकल सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होईल; तर दूरगामी गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे. प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार असल्याने रेल्वे प्रशासन त्यावर उपाययोजना आखत आहे.

'महारेल'ने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच क्रेन, यंत्रसामग्री आणि पाडकामाची प्राथमिक तयारी पूर्ण केली होती. मात्र रेल्वेकडून ब्लॉक मंजूर न झाल्याने जवळपास महिनाभर हे काम ठप्प राहिले. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि महारेल यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली असून त्यात आठ ब्लॉक्सची योजना निश्चित करण्यात आली आहे.

वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

आता या आठ ब्लॉक्सपैकी, दोन तासांचे ब्लॉक कोणत्या दिवशी घेण्यात येणार आणि सलग १८ तासांचा मोठा ब्लॉक नेमका कधी असेल, याचे वेळापत्रक मध्य रेल्वे लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. प्रवाशांना आगाऊ सूचना देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे.

एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर वरळी–शिवडी उन्नत मार्गाचा वेग वाढणार असला तरी, येत्या काही दिवसांत मुंबईकरांना रेल्वे प्रवासात मोठी तडजोड करावी लागणार आहे.

Comments
Add Comment