रायगडमध्ये आता २०९ नगरसेवक पदांसाठी निवडणूक
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग आणि रोहा या तीन नगरपालिकांमध्ये एकूण आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पेण नगरपरिषदेत सर्वाधिक ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, तर अलिबाग आणि रोहामध्ये प्रत्येकी एक नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये रोह्यात राजेंद्र जैन (काँग्रेस), अलिबागमध्ये प्रशांत नाईक (शेकाप), पेणमध्य दीपक गुरव (राष्ट्रवादी काँग्रेस), वसुधा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुशिला ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस), मालती म्हात्रे (भाजप), स्मीता माळी (भाजप), अभिराज कडू (भाजप) यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, महाड, रोहा, पेण, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्व ठिकाणी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले.
भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर शेकापचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मरूड रोहा, महाड, पेण, उरण, माथेरान या १० नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार असून, दहा नगर परिषदांमध्ये २१७ नगरसेवक निवडून द्यायचे होको, त्यापैकी आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे आता २०९ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे.
रायगड जिल्ह्यात ७७० जणांची शस्त्रे पोलिसांकडे जमा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी
रायगड जिल्ह्यातील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर परवाना असलेली पिस्तूल, बंदूक, आदी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावी लागतात. जिल्ह्यातील दहा नगर परिषद क्षेत्रातील शस्त्रे परवानाधारक ७७० जणांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत. राज्यात ४ नोव्हेंबर रोजी नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, महाड, रोहा, पेण, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था चोख राहावी, तसेच निवडणूक प्रक्रियेच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी निवडणूक काळात नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी घेतलेली शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात येतात.
नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांना चिन्हांचे वाटप
रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी बुधवारी झालेल्या चिन्ह वाटपासह स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वच नगर परिषदांमध्ये चिन्ह वाटपाची प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. अलिबाग नगर परिषद क्षेत्रात एकूण दहा प्रभागांमध्ये २० जागांसाठी निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय आघाड्या स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी केली आहे, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याशिवाय शिवसेना (ठाकरेंचा गट)ने स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत शेकाप पक्षाला 'खटारा' हे चिन्ह देण्यात आले असून, अपक्ष उमेदवार 'कपबशी' चिन्हावर रिंगणात उतरणार आहेत. इतर राष्ट्रीय आणि प्रमुख पक्ष मात्र आपल्या अधिकृत चिन्हांवरच निवडणूक लढवत असल्याची माहिती तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली. अलिबाग नगर परिषदमध्ये एकच उमेदवार अपक्ष आहे. चिन्ह वाटपाची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात शांततेत पार पडल्याने उमेदवार आता प्रचार युद्धासाठी सज्ज झाले आहेत. आघाड्या, स्वतंत्र उमेदवारी आणि प्रत्येक प्रभागातील स्थानिक समीकरणांमुळे अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नगर परिषदांची निवडणूक अधिक रंगतदार होणार एवढे मात्र निश्चित!






